वेड्यांचा बाजार- मेस्सीने अश्रू पुसलेल्या टिश्यूचा लिलाव

जगातील अद्वितीय फुटबॉलपटूमध्ये अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचा समावेश आहे. जगात फुटबॉलप्रेमीची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे स्टार फुटबॉलपटूनी वापरलेल्या वस्तूंचा प्रचंड किमतीला लिलाव होणे ही बाब तशी नवलाची राहीलेली नाही. पण म्हणून कुठल्या वस्तूला किती किंमत द्यायची याला काही मर्यादा असतेच. अन्यथा त्याला वेड्यांचा बाजार म्हटले जाते. असाच एक लिलाव पुकारला गेला असून त्यात बार्सिलोना क्लबचा निरोप घेताना मेस्सिला अश्रू अनावर झाले आणि त्याने ज्या टिश्यूला अश्रू पुसले त्या टिश्यूचा लिलाव पुकारला गेला असून या टिश्यूची ७ कोटी ४३ लाखाला विक्री झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३४ वर्षीय मेस्सीला २१ वर्षांच्या बार्सिलोना क्लबबरोबरच्या सहवासाचा निरोप घेताना रडू आवरेना. तेव्हा त्याची पार्टनर अँटोलीनोने त्याला डोळे पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला. एका अज्ञात व्यक्तीने मेस्सीने वापरलेले टिश्यू एकत्र केले आणि त्याची विक्रीसाठी ऑनलाईन जाहिरात दिली. त्यात त्या व्यक्तीने ‘ मेस्सीचे अश्रू या टिश्यूमध्ये आहेत. म्हणजेच त्याचे जीन्स टिश्यूमध्ये आहेत. याचा वापर करून मेस्सीचा क्लोन बनविणे शक्य’ असल्याचा दावा केला आहे.

लोकप्रिय वेबसाईट मार्काडो लिबरेचा या विक्रीशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या ऑनलाईन प्रोडक्ट कंपनीने हा टिश्यू प्लास्टिक पॅक करून विक्रीला आणला आणि त्यावर मेस्सीचा भावूक फोटो छापला गेला होता असे समजते. मेस्सी ३ अब्ज डॉलर्सचा करार करून पॅरीस सेंट जर्मेन क्लब जॉइन केल्यावर पत्नी आणि तीन मुलांसह ज्या ले मोन्सेस हॉटेल मध्ये राहिला आहे त्या हॉटेलचे एक रात्रीचे भाडे २० हजार युरो म्हणजे १७.५ लाख रुपये असल्याचेही सांगितले जात आहे.