न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही; अनिल देशमुखांनी अखेर सोडले मौन


मुंबई – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. त्यांना पाचव्यांदा समन्स बजावल्यानंतर ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण, ईडीसमोर अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल देशमूख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझी ईडीच्या बाबतीतील याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालय लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. याआधी ५व्यांदा समन्सं बजावल्यानंतर अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते.