…यामुळे पुण्यातील मंदिरातून हटवला मोदींचा पुतळा


पुणे : पुण्यातील औंध परिसरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी स्वतःच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर चारच दिवसांपूर्वी बांधले होते. त्यात मोदी यांचा पुतळा देखील बसवण्यात आला होता. मोदी यांच्यावरील प्रचंड प्रेमाच्या भावनेतून एक मंदिर उभारले होते यानंतर बराच वाद ही निर्माण झाला होता, पण मुंडे यांनी काल रात्री उशिरा मोदींचा पुतळा मंदिरातून हटवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यासाठी भावना फार चांगली होती व आहे. परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. जिवंत व्यक्तीचे अशाप्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वाला व विचाराला अनुसरून नसल्याची समज देण्यात आली. आपल्या मनामध्ये पंतप्रधानांबद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरापणे व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवल्या जाव्यात. त्यानुसार कृती व कार्य करावे असे सांगण्यात आले. त्यामुळे हा पुतळा स्थानिक नगरसेवक यांच्या कार्यालयात ठेवल्याचे मुंडे यांनी सांगितले. पण गेल्या चार दिवसांपासून प्रसिद्धी झोतात आलेले मुंडे पुतळा हटवल्यानंतर माध्यमांशी सविस्तर बोलणे टाळले.

पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पहिले मंदिर होते. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला होता. मंदिरावरुन टीका केली, तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली होती. मुंडे हे गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काम करतात. पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारले, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचे मुंडे म्हणाले होते.