१९ ऑगस्टलाच टांगसाळीत बनले होते रुपयाचे पहिले नाणे

भारताचे चलन रुपयाचे पहिले नाणे १९ ऑगस्ट १७५७ साली कोलकाता येथील टांगसाळीत पाडले गेले होते याची माहिती अनेकांना नसेल. म्हणजे रुपयाचे नाणे चलनात आले त्याला आज २६४ वर्षे झाली. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती आणि आशियात सिल्क, कॉटन, नीळ, चहा, मीठ यांचा व्यापार होत असे. या कंपनीने १६४० च्या आसपास भारतात २३ कारखाने सुरु केले होते आणि त्यात १०० कामगार काम करत होते.

१७५७ च्या प्लासीच्या लढाईत विजय मिळविल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या नबाबाकडून शासन अधिकार तह करून मिळविले. त्यातच नाणी पाडण्याच्या अधिकाराचा समावेश होता. त्यासाठी कोलकाता येथे टांकसाळ सुरु केली गेली आणि याच टांगसाळीत १९ ऑगस्ट १७५७ रोजी पहिले रुपया नाणे पाडले गेले. अर्थात कोलकाता पूर्वी सुरत आणि मुंबई येथे टांगसाळी सुरु झाल्या होत्या पण रुपयाचे पहिले नाणे कोलकाता टांगसाळीत बनले.

सुरत मधील टांगसाळीतून मागणीनुसार नाण्यांचा पुरवठा होत नव्हता त्यामुळे १६३६ मध्ये अहमदाबाद आणि १६७२ मध्ये मुंबईत टांगसाळी सुरु झाल्या. मुंबईत युरोपियन स्टाईलची सोने, चांदी आणि तांब्याची नाणी बनत त्यांना अनुक्रमे कॅरोलीना, एंजलीना आणि कॉपरुन म्हटले जात असे. त्यावेळी देशात अनेक आकार, मूल्य आणि वजनाची वेगवेगळी नाणी वेगवेगळया राज्यात चलनात होती. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात अडचण होऊ लागली. अखेरी १८३५ मध्ये युनीफॉर्म कॉईनेज कायदा पास झाला आणि देशात एकच चलन सुरु झाले.

या नाण्यांवर एका बाजूला ब्रिटीश किंग विलियम फोरचे मस्तक तर दुसऱ्या बाजूला त्या नाण्याचे इंग्लिश आणि पर्शियन भाषेत मूल्य असे. १८५७ पासून भारतीय नाण्यांवर ब्रिटीश राजे राण्या यांची प्रतिमा आली. पहिल्या महायुद्धाच्या काळात चांदीची कमतरता निर्माण झाल्यावर कागदी नोटा छापल्या गेल्या. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर सुद्धा १९५० पर्यंत हीच नाणी चलनात होती.