जगातील टॉप १०० धनकुबेरांच्या यादीत ‘डी मार्ट’चे दमाणी

गुंतवणूक आणि रिटेल चेन मार्ट ‘ डी मार्ट’ चे मालक, अब्जाधीश राधाकिशन दमाणी यांचा जगातील टॉप १०० धनकुबेरांच्या यादीत समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग बिलीनेअर डेली रँकिंग इंडेक्स नुसार दमाणी या यादीत १९.२ अब्ज डॉलर्स संपत्ती सह ९८ व्या स्थानी पोहोचले आहेत. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, पालनजी मिस्त्री,शिव नाडर आणि लक्ष्मी मित्तल अगोदरपासूनच सामील आहेत.

एका सर्वसामान्य मारवाडी परिवारात जन्मलेल्या राधाकिशन यांचे बालपण मुंबईत एका खोलीच्या बिऱ्हाडात गेले. कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून ते दलाल स्ट्रीट वर काम करू लागले. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या बॉलबेरिंग व्यवसायात बाहेर पडून त्यांनी स्टॉक मार्केट ब्रोकर आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केले आणि नंतर तेही काम सोडले.

२००० साली त्यांनी डी मार्ट सुरु करायचा निर्णय घेतला आणि २००२ मध्ये पवई येथे पहिले स्टोअर सुरु केले. २०१० मध्ये ही संख्या २५ स्टोअर्सवर गेली आणि त्यानंतर अतिशय वेगाने त्यात वाढ होत गेली. २०१७ मध्ये डी मार्ट सार्वजनिक बनले. राधाकिशन यांना अतिशय साधे राहायला आवडते आणि मीडियातील चर्चे पासून ते नेहमी दूर राहतात असे सांगितले जाते.