सर्वात मोठ्या हॅकिंगचे बक्षीस, कंपनीने हॅकरलाच दिली नोकरी

गेल्या आठवड्यातच क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी झाली होती आणि त्या चोरीचे बक्षीस संबंधित हॅकरला दिले गेले आहे. पॉली नेटवर्क या क्रिप्टोकरन्सी ट्रान्स्फर सेवा देणाऱ्या कंपनीत सायबर घुसखोरी करून ४५०० कोटी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी हॅकर्सनी लंपास केली होती. आता कंपनीने त्या हॅकरलाच कंपनीत नोकरी देऊन त्याची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

कंपनीने या हॅकरचे नाव ‘व्हाईट हॅट’ असे सांगितले असले तरी हे नाव खोटे आहे. पण कंपनीच्या म्हणण्यानुसार या हॅकरचे कौशल्य वादातीत आहे आणि त्यामुळेच त्याला एथिकल हॅकर म्हणून कंपनीत महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. कंपनीत काय उणीवा आहेत याची माहिती या नव्या सुरक्षा सल्लागाराकडून कंपनीला मिळाली असल्याचेही सांगितले जात आहे.

या हॅकिंग मध्ये हॅकर्सनी २६.९ कोटी डॉलर्स किमतीचे इथेरीयम आणि ८.४ कोटी डॉलर्सचे पॉलीगॉन अश्या दोन क्रिप्टोकरन्सी लंपास केल्या होत्या त्यातील १९३० कोटी डॉलर्सचे चलन दुसरे दिवशी कंपनीला परत करण्यात आले होते. कंपनीने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मि.व्हाईट हॅट या हॅकिंग साठी कायदेशीर जबाबदार नाही आणि हॅकर्स चोरलेले पैसे परत करतील असे म्हटले आहे.