महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार, कारण… नितेश राणेंची ठाकरे सरकारवर तीव्र शब्दात टीका


मुंबई – महाराष्ट्रात कोरोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. यामध्ये लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पण महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुन्हा एकदा धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, अद्यापही मंदिरे उघडण्यात न आल्यामुळे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे.

भाजपने यापुर्वी देखील लोकांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल ठाकरे सरकारवर टीका केली होती. सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. त्यांनी धर्मापेक्षा मद्यविक्रीला प्राधान्य दिले, अशी टीका भाजपने केली होती.


दरम्यान, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार महाराष्ट्रात आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार, कारण हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे. हिंदू हो… तो डर के रहो.. ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र !!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणेंनी यापुर्वी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू… मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम झाला असल्याचे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकावर टीका केली होती.