कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे निमंत्रण – संजय राऊत


मुंबई – राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा ठाणे शहरात सोमवारी विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली होती.

याप्रकरणी यात्रेचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना नियमांचे यात्रेमध्ये उल्लंघन झाल्याची नोंद या गुन्ह्यामध्ये घेण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून राज्यांमध्ये काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याचे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

भाजपला त्यांनी संयम बाळगण्यास सांगितले आहे. जन आशीर्वाद यात्रा ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या प्रकारच्या गर्दीचे सध्या तुम्ही शक्तीप्रदर्शन करता आहात, हे एक प्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करत आहेत. ठीक आहे, पण किमान तुम्ही संयम पाळा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर दिले आहे. कृपया संजय राऊत यांना सांगा की हे माझ्या लक्षात आले आहे, पण आम्ही सरकारची धोरणे लोकांपर्यंत नेणे थांबवू शकत नाही. मी हे म्हणू नये, पण जेव्हा ते मास्क न घालता, एकमेकांच्या जवळ उभे असतात आणि सभागृहात असतात, तेव्हाची दृश्ये पहा, असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.