Fact Check : सोशल मीडियात व्हायरल झालेला ‘तो’ फोटो अफगाणिस्तानाचा नव्हे, तर फिलिपिन्समधील!


नवी दिल्ली – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील लोकांमध्ये भीती आहे. तेथील लोक इतर देशांमध्ये पलायन करुन जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानात हजारो इतर देशातील लोक देखील अडकले आहेत. यात भारतासह अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, न्यूझीलंडसह अन्य काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत काही देशांनी आपापल्या नागरिकांना एअरलिफ्ट करुन मायदेशी परत आणले आहे.


या सर्व गोंधळादरम्यान सोशल मीडियासह माध्यमांमध्ये एक फोटो व्हायरल झाला आहे, जो अफगाणिस्तानमधील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोमध्ये शेकडो नागरिक एका विमानात दाटीवाटीने बसलेले दिसून येत आहेत. पण हा फोटो अफगाणिस्तानमधील नसून 2013 सालचा फिलिपिन्समधील आहे. मूळ फोटो फिलिपिन्समधील टॅक्लोबान शहरावर विनाशकारी चक्रीवादळ धडकल्यानंतर काही दिवसांनी यूएस एअरफोर्सकडून तिथे अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यावेळचा आहे. यासंदर्भातील वृत्त राऊटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.


हा फोटो काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला असून काबुल विमानतळाच्या बाहेर निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या भारतीय वायुसेनेने रेस्क्यू ऑपरेशन केले, असाही दावा या फोटोसह काही लोकांनी केला होता. पण हा मूळ फोटो यूएसएएफच्या वेबसाइटवर देखील आहे. तेथील माहितीनुसार हा फोटो 17 नोव्हेंबर 2013 रोजी सुपर टायफून हैयान वादळानंतर लष्करी विमान, सी -17 ग्लोबमास्टर III चा आहे. या विमानात 670 पेक्षा जास्त टॅक्लोबान रहिवासी होते. हैयान चक्रीवादळाने 8 नोव्हेंबर 2013 रोजी किनाऱ्यावरील प्रदेशात धुमाकूळ घालत हाहाकार केला होता आणि त्यामुळे या प्रांतातील टॅक्लोबान शहराची मोठी हानी झाली होती.