१२ हजार फुट उंचीवर घेता येणार गरमागरम मॅकडोनल्ड बर्गरचा स्वाद

तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असलात आणि खाण्या बरोबरच खाण्याची जागा, रेस्टॉरंट यांनाही महत्व देत असला तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जगप्रसिद्ध फास्ट फूड चेन मॅकडोनल्ड ने निर्सगाच्या कुशीत, मेघांच्या सानिध्यात त्यांचे नवे रेस्टॉरंट सुरु केले आहे. तब्बल १२ हजार फुट उंचीवरचे हे नवे रेस्टॉरंट तिबेटची राजधानी ल्हासा येथे सुरु झाले आहे. मॅकडोनल्डचे हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे पहिले रेस्टॉरंट आहे. यापूर्वी ब्रिटन मध्ये मॅकडोनल्डने ४३७९ फुट उंचीवरचे रेस्टॉरंट बेन नेविक येथे सुरु केले होते.

तिबेट मधील नवे रेस्टॉरंट १२१३९ फुट उंचीवर असून येथे ग्राहकांना गरमागरम बर्गर, मॅक पफ, फ्राईज सह हॅपी मील असा सिग्नेचर मेन्यू मिळणार आहे. या ठिकाणी ६० कर्मचारी नेमले गेले आहेत आणि सेफ सर्व्हिस, मोबाईल पेमेंटचा आनंद खाद्य प्रेमी घेऊ शकणार आहेत.

विश्वप्रसिध्द आणि जागतिक वारसा यादीत सामील असलेल्या पटोला पॅलेस समोरच हे नवे रेस्टॉरंट असून आसपास निसर्गसौंदर्याची रेलचेल आहे. उंच पहाड, ढग आणि हिरवाईचा अनुभव घेतानाच चवदार खाद्यपदार्थांचा स्वाद ग्राहक चाखू शकणार आहेत. तिबेट मध्ये शेकडो पर्यटक येतात आणि मॅकडोनल्ड ही त्यांच्या साठी डबल ट्रीट ठरेल असा दावा केला जात आहे.