काश्मीर हा भारत पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत मामला- तालिबान

अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केल्यावर पाकिस्तानी न्यूज चॅनलशी साधलेल्या संवादात तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीन याने काश्मीर प्रश्न तालीबानच्या अजेंड्यावर नाही, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे वक्तव्य केले आहे. सुहैल याने भारताने अफगाणिस्तानात सुरु केलेले प्रकल्प सुरु ठेवावेत असेही आवाहन केले असून हे प्रकल्प अफगाणी जनतेच्या हिताचे आहेत असेही म्हटले आहे.

तालिबानने अफगाणिस्थानवर कब्जा केल्यापासून विकास आणि अनुशासन यावर गप्पा सुरु केल्या असल्या तरी पाकिस्तानने आश्रय दिलेल्या लष्कर ए तैयबा आणि तहरीब ए तालिबान या संघटनांनी अफगाणिस्थानच्या काही भागात तालिबानच्या मदतीने चेक पोस्ट उभारली आहेत. भारताने अफगाणिस्थान मध्ये ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि हे सर्व प्रकल्प अफगाणिस्थानच्या विकासासाठी उपयुक्त ठरले आहेत.

तालिबानी प्रवक्ते काहीही भाष्य करत असले तरी भारताने काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तालिबानी आता प्रत्यक्ष ताबा नियंत्रणरेषेपासून अवघ्या ४०० किमी अंतरावर आले आहेत. पाकिस्तानचे आयएसआय तालिबानींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करत असून कंदहार विमान अपहरण प्रकरणी तालिबाननेच मदत केली होती याचा विसर भारताला पडलेला नाही.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानातील हिंदुना भारत आश्रय देईल असे जाहीर केले आहे.