अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत असलेला तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर आहे तरी कोण?


काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. सत्तेचे शांततेच्या मार्गाने हस्तांतरण करण्याची तयारी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी केली असून तालिबानच्या कोणत्या नेत्याकडे सत्तेची कमान जाते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. अशात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार याचे नाव सर्वांत पुढे येत आहे. राष्ट्रपती पदासाठी त्याच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

1994 साली ज्या चार लोकांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. सध्या तो तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तसेच तालिबानच्या शांती वार्ता पथकाचा प्रमुख सदस्य आहे. 1980 च्या दशकात मुल्ला बरादर यांने सोव्हिएत रशियाच्या सैन्याच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये जिहाद पुकारला होता. 1992 साली, रशियन सैन्याच्या माघारीनंतर देशाचे नेतृत्व कोण करणार यावर गृहयुद्ध सुरु झाले. त्यावेळी मुल्ला बरादर यांने आपला नातेवाईक मुल्ला उमर याच्या मदतीने कंदहारमध्ये एक मदरसा स्थापन केला. नंतरच्या काळात 1996 साली तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून आपली सत्ता स्थापन केली.

या प्रदेशातील सगळी समिकरणे अमेरिकेतील 9/11 च्या घटनेनंतर बदलली. सन 2001 साली अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तालिबानला सत्तेतून बाजूला सारले. त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या विरोधात मोठे बंड झाले, त्याचे नेतृत्व मुल्ला बरादर याने केले होते. अमेरिका आणि पाकिस्तानच्या सन 2010 साली एका संयुक्त कारवाईत मुल्ला बरादर याला कराचीतून अटक करण्यात आली होती.

मुल्ला बरादर याच्याबद्दल सन 2012 पर्यंत जास्त काही माहिती नव्हती. 2013 साली अफगाणिस्तान सरकारने देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तालिबानशी शांती वार्ता सुरु केली. त्यामध्ये ज्या प्रमुख कैद्यांना सोडण्यात आले, त्यामध्ये मुल्ला बरादर याचा समावेश होता. पाकिस्तानने सप्टेंबर 2013 साली त्याला सोडून दिल्यानंतर तो कुठे गेला याची नेमकी माहिती कुणालाच नाही.

तालिबानचा सर्वोच्च नेता आणि मुल्ला मोहम्मद उमर याचा सर्वात विश्वासू व्यक्ती म्हणून मुल्ला अब्दुल गनी बरादर याचे नाव घेतले जायचे. असे सांगण्यात येते की मुल्ला बरादरची बहिण ही मुल्ला उमर याची पत्नी होती आणि मुल्ला उमरची बहिण ही मुल्ला बरादरची पत्नी होती. मुल्ला बरादरची पत्नी ही तालिबानच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवायची. सन 2018 साली अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी कतारमध्ये तालिबानने आपले कार्यालय सुरु केले. त्यावेळी मुल्ला अब्दुल गनी बरादरला राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले होते.

अमेरिकेने ज्यावेळी तालिबानची सत्ता उलथवून लावली त्यावेली मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा उप संरक्षण मंत्री होता. अमेरिकेशी तालिबानने चर्चा करावी या गोष्टीचा मुल्ला अब्दुल गनी बरादर हा समर्थक होता. संयुक्त राष्ट्राने त्याच्यावर बंदी घातली होती.

अमेरिका आणि नाटोचे सैन्य तब्बल वीस वर्षाच्या युद्धानंतर अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेने या देशावर कब्जा मिळवला आहे. तालिबानने आपल्याला सत्तेचे हस्तातरण हे शांततेच्या मार्गाने व्हावे, अशी मागणी राष्ट्रपती अशरफ घणी यांच्याकडे केली आहे. अशरफ घणी यांच्याकडे आता काहीच पर्याय नसून त्यांनीही आपली सत्ता सोडण्याची तयारी सुरु केल्यामुळे लवकरच तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तामध्ये सरकार अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.