सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने बजावले पाचव्यांदा समन्स


मुंबई – मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावे, याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांनी दाखल केली होती. पण, ही याचिका सोमवारी न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले हे पाचवे समन्स आहे. उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आता तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांची या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीने आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फार्स अधिकाधिक आवळला जात आहे. ईडीने नुकतेच अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

या प्रकरणामध्ये ईडीने याआधी अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण, अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी होऊ शकलेली नाही. ईडीकडून पाठवण्यात येणाऱ्या समन्सला अनिल देशमुख यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे ईडीने न्यायालयात देखील यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.