टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा; पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार टीम इंडिया


दुबई – या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. भारतात होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.


याआधीच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे गट जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० विश्वचषक असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

सुपर १२ चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुबईमध्ये २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसरा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्याच दिवशी खेळला जाईल. तर सुपर १२ मध्ये, गट २ मधील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. या दिवशी फक्त एक सामना खेळला जाईल.

सुपर १२ च्या गट १ मध्ये वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्या व्यतिरिक्त गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता संघ पहिल्या फेरीत असेल. दुसरीकडे, गट २ मध्ये, भारत आणि पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसोबत पहिल्या फेरीच्या गट ब चा विजेता संघ आणि गट अ चा उपविजेता संघ असेल.