रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका


मुंबई – शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपसोबत फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. पण, भाजपकडून सुरुवातीपासूनच राज्यात सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असे देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे.

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, अशी ‘भविष्यवाणी’ रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना वर्तवली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला. हे तीन पक्षांचे सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाही. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नसल्याचे दानवे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी सरकारला अमर, अकबर, अँथनी या विशेषणावरून चित्रपटाचीच उपमा दिली आहे. चित्रपट कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढले, तर माणसांना पूर्ण वेळ बसावेच लागते. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिले आहेत. त्यांच्या चांगल्या कामांना आम्ही पाठिंबा देऊ आणि वाईट कामांना विरोध करू, असे दानवे म्हणाले आहेत.

एकीकडे महाराष्ट्र सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका करताना दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे देखील सांगितले आहे. उद्धवजींनी मला ८ दिवसांपूर्वी फोन केला. ते माझ्याशीही बोलले. माझे दोनदा बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचे भेटायचे ठरले असल्याचे ते म्हणाले.