मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयांची प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर


मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजच्या कट ऑफ हा दरवर्षी प्रमाणे यंदाही ९० टक्क्यांच्या पुढे दिसत आहे. काही कॉलेजच्या कट ऑफमध्ये तर यंदा तीन ते चार टक्क्यांची वाढ देखील झाली आहे.

यंदा मुंबई विभागाचा इयत्ता बारावीचा निकाल हा मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढलेला आहे. त्यामुळे कट ऑफमध्ये निश्चतच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नामांकित कॉलेजपैकी झेवियर्स कॉलेजचा बीएची कट ऑफ हा ९८ टक्के आहे, तर बी एस्सी प्रथमवर्षाचा कट ऑफ देखील ९२ टक्के आहे. याचबरोबर हिंदुजा व विल्सन कॉलेजचे कट ऑफ देखील नव्वदीच्या पुढे दिसून येत आहेत. काही ठिकाणी ९५ टक्क्यांच्यावर हे कट ऑफ आहेत.

यामुळे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कदाचित दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे, तर ज्यांना पहिल्या यादीनुसार प्रवेश मिळाला आहे, त्यांना उद्यापासून प्रवेश निश्चितीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. त्यांना आपले कॉलेज निश्चित करण्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत वेळ आहे.

मुंबई विद्यापीठाशी संबधित सेंट झेवियर्स कॉलेज, सेठ एलयूजे कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सर एमवी कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्सने यूजीची पहिली यादी जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार एमएल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बीकॉम प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कटऑफ ६०० पैकी ५२१ आला आहे.

एमयू बीए, बीएएफ, बीकॉम, बीएससी, बीएफएम, बीएमएम आणि विद्यापीठातील अन्य अभ्यासक्रमांसाठी मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाईट mu.ac.in वर जाहीर करण्यात आली आहे. तसेच, प्रवेशासाठी इच्छुक असेलले विद्यार्थी संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवर देखील ही यादी पाहू शकतात.

प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्व फॉर्मसह ऑनलाइन प्रवेशपत्र जमा करायचे होते. यासाठी प्रवेश फॉर्म ५ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आले होते. याचबरोबर, डिक्लेरेशन फॉर्म किंवा अंडरटेकींगबरोबर कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया १८ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून सुरू होणार असून, २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

तर, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत यासाठी ऑनलाइन पडताळणी व शुल्क भरले जाईल. याचबरोबर, तिसरी गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल आणि कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर पर्यंत असणार आहे.