अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुंबईसंदर्भात चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत केले एक भाष्य


मुंबई – अफगाणिस्तानातील अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून काबूलचा तालिबानने ताबा घेतला आहे. युद्धग्रस्त देश तालिबानी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळल्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.

असे असतानाच अफगाणिस्तानमध्ये २०० भारतीय नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर येत असून त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पण आता संपूर्ण जगामध्ये चर्चेत असणाऱ्या या विषयावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावरुन एक इशारा दिला आहे.


निलेश राणे यांनी अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील दहशतवादी स्लीपर सेल्ससंदर्भात चिंता व्यक्त करत राज्य सरकारकडे प्रकरण गंभीरतेने हाताळण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आणि गांभीर्याने हा विषय हाताळावा, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तसेच ट्विटच्या शेवटी, नंतर सांगतील केंद्राने कळवलं नाही, असे म्हणत राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे.