न्यूझीलंडने फक्त एक कोरोनाबाधित आढळला आणि अख्खा देश लॉकडाऊन केला


वेलिंग्टन – कोरोना महामारीच्या संकटाचे जगभरात थैमान सुरू असून जगभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विषाणू ठाण मांडून बसला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढणे व्यापक लसीकरण मोहिमेनंतर देखील काही थांबत नसताना एक देश असा होता, जिथे गेल्या सहा महिन्यांत एकही नवा कोरोनाबाधित सापडला नव्हता.

पण, तिथे आज तब्बल सहा महिन्यांनंतर पहिला कोरोनाबाधित सापडला. या देशाने याचा धसका घेतला आणि संपूर्ण देशात कठोर लॉकडाऊनची घोषणा करून टाकली. तेथील सरकारला हा कोरोनाबाधित डेल्टा व्हेरिएंटचा असावा, अशी भिती वाटत असून संभाव्य गंभीर परिणाम टाळण्यासाठी तातडीने लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

एका नव्या कोरोनाबाधितामुळे ज्या देशाने कठोर लॉकडाऊनची घोषणा केली, तो देश आहे न्यूझीलंड! गेल्या ६ महिन्यांपासून न्यूझीलंडमध्ये एकही नवा कोरोनाबाधित सापडला नव्हता. न्यूझीलंडच जगभरात सर्वात आधी कोरोनामुक्त होणारा देश देखील होता. त्यामुळे या देशात निर्बंध उठवण्यात आले होते. सर्व व्यवहार देखील सुरळीत पद्धतीने सुरू होते. पण, न्यूझीलंडमधील सर्वात मोठ शहर असलेल्या ऑकलंडमध्ये हा कोरोनाबाधित सापडल्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या. पण हा कोरोनाबाधित डेल्टा या वेगाने संसर्ग होणाऱ्या प्रकाराने बाधित झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवताच प्रशासनाची झोप उडाली. पाठोपाठ न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांनी कठोर लॉकडाऊनची घोषणा केली.

पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनुसार, संपूर्ण न्यूझीलंडमध्ये चौथ्या टप्प्याचा अर्थात कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस हा लॉकडाऊन लागू असेल. ज्या ठिकाणी संबंधित कोरोनाबाधित आढळला, त्या ऑकलंड या किनारी शहरामध्ये तब्बल ७ दिवस हा लॉकडाऊन लागू असेल. शाळा, कार्यालये, उद्योगधंदे या काळामध्ये पूर्णपणे बंद असतील. फक्त जीवनावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील. अचाकन लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे सामान्यांची मात्र बाजारात धावपळ दिसायला लागली आहे.

पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना या निर्णयाविषयी विचारणा केली असता म्हणाल्या, शक्य तितक्या लवकर या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण सगळ्याच चांगली कुठली गोष्ट करू शकतो, तर तो कठोर लॉकडाऊन आहे. कठोर निर्बंधांनी सुरुवात करून नंतर ते कमी करणे हे कमी निर्बंध लागू करून व्हायरसला मोकळीक देत त्याला वाढताना बघण्यापेक्षा चांगले आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.