क्रिकेटच्या पंढरीत ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमाची नोंद!


लॉर्ड्स – भारताने लॉर्ड्स कसोटी सामन्यात इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडला या कसोटीच्या पाचव्या दिवशी ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज दुसऱ्या डावात ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. भारताने यापूर्वी १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सवर जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

या मालिकेतील दोन्ही कसोटीत कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला असला, तरी लॉर्ड्सवरील विजय हा त्याच्या आत्मविश्वास भरण्याचे काम करेल. विराटला दोन्ही कसोटीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण पुढच्या तीन कसोटीत तो सर्व भरपाई करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळला जाईल.