हैती भूकंप; आतापर्यंत 1300 जणांचा मृत्यू, हजारो गंभीर जखमी


हैती – 7.2 रिश्टर क्षमतेच्या शक्तीशाली भूकंपाने हैती या कॅरेबियन देशात होत्याचे नव्हते केले. देशाची परिस्थिती या भूकंपामुळे अत्यंत बिकट झाली आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 1300 लोकांचा या भूकंपात मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. शहरांच्या शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हैतीच्या नागरिक सुरक्षा संस्थेनं जारी केलेल्या माहितीनुसार, हैतीमध्ये आलेल्या 7.2 तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपामुळे 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. हैतीच्या नागरी संरक्षण सेवेने एका ट्वीटमध्ये माहिती दिली आहे की, हैतीतील सूदमध्ये 1,054, निप्समध्ये 122, ग्रँड एन्सेमध्ये 119 आणि नॉर्ड-ऑएस्टमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हैतीमध्ये भूकंपानंतरही काही सौम्य भूकंपाचे झटके जाणवत होते. भूकंपामुळे इमारती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकजण बेघर झाले आहेत. काही नागरिकांनी रस्त्यावरच रात्र काढली. रुग्णालयांत तर जागा शिल्लक नाही. भूकंपामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हैतीच्या पंतप्रधानांनी देशात एका महिन्याची आणीबाणी घोषित केली आहे. तसेच नुकसानीचे आकलन होईपर्यंत आंतरराष्ट्रीय मदत घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.