फेसबुककडून तालिबानी नेत्यांसह अनेकांच्या अकाऊंटवर बंदी


नवी दिल्ली – तालिबानच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने मोठी कारवाई केली आहे. तालिबान ही अमेरिकेच्या कायद्यानुसार दहशतवादी संघटना असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे फेसबुकच्या सेवांपासून तालिबानला वंचित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तालिबानची सर्व अकाऊंट हटवली जाणार आहेत. तसेच, तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाऊंटवर बंदी घातली जाईल अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील सत्ता काबिज केल्यानंतर तालिबानला प्रोत्साहन देणारी सर्व माहिती फेसबुक काढत आहेत. फेसबुक इंक एक्झिक्युटिव्हने सांगितले की, कंपनी तालिबानला प्रोत्साहन देणारी सामग्री त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सक्रियपणे काढून टाकत आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीकडे दरी आणि पश्तो भाषा तज्ज्ञांची संपूर्ण टीम आहे, जी आम्हाला स्थानिक माहितीची देखरेख आणि माहिती देत ​​आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक तालिबानी प्रवक्ते, नेते आहेत. यापैकी अनेकांचे फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहेत आणि तिथून सातत्याने आपली वक्तव्य करत आहेत. आता फेसबुकने ही कारवाई केल्यामुळे त्यांचे लक्ष ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मवर असणार आहे.