काल दिवसभरात देशात 25 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 437 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना प्रादुर्भावामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल पाच महिन्यांनंतर सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 437 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशभरात गेल्या 24 तासांत 36,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 50 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 32 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 48 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 69 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात मागील दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची कमी होऊ लागली आहे. काल (सोमवारी) 4,145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 95 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86टक्के आहे. आज राज्यात 100 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोना प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असताना, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटने डोके वर काढले आहे. सध्या डेल्टा व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णांनी राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल (सोमवारी) कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरिअंटची लागण होत आहे.

डेल्टा प्लसचे सध्या राज्यात एकूण 76 रुग्ण आहेत. तर यापैकी लस घेतलेल्या 18 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत राज्यात 5 डेल्टा प्लस व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची लागण झालेल्या 10 रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी सहा कोल्हापूर तीन रत्नागिरी तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 190 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 271 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,354 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1966 दिवसांवर गेला आहे.