आनंद महिंद्रांनी यामुळे Chutzpah शब्द वापरत केले टीम इंडियाचे कौतुक


भारतीय गोलंदाजांनी इंग्लड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर छाप पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी मोहम्मद शमीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडसमोर विजयासाठी ६० षटकांत २७२ धावांचे आव्हान ठेवले. मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी Chutzpah! या अवघ्या एका शब्दामध्ये भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा सुद्धा इतर सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा भारताने भन्नाट कामगिरी केली किंवा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आनंद महिंद्रांच्या ट्विटर टाइमलाइनवर उड्या पडतात, कारण ते अगदी हटके पद्धतीने व्यक्त होतात. असेच काहीसे काल भारताने लॉर्ड्सवर कसोटी जिंकल्यानंतर झाले. भारतीय वेळेनुसार रात्री अकराच्या सुमारास भारताने सामना जिंकला. त्यानंतर सर्वच स्तरामधून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यातच आनंद महिंद्रांनीही अगदी एका शब्दामध्ये भारतीय संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले.

जेव्हा जेव्हा Chutzpah हा शब्द वापरण्याची वेळ मला येते तेव्हा फार आनंद होतो, महिंद्रांनी म्हटले आहे. Chutzpah या शब्दाचा उच्चार हॉट्स्पा असा होत असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. या शब्दाचा अर्थ खूप आत्मविश्वास किंवा धैर्य असणे असा होतो, असेही आनंद महिंद्रांनी पुढे म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणतात, या भारतीय संघामध्ये या गुणांची (खूप आत्मविश्वास आणि धैर्य) कमतरता नाही. आपण सामन्यात विजय खेचून आणू शकतो, याबद्दल त्यांना स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास असल्याचे नमूद केले आहे. तसेच टाळ्या वाजवतानाचे इमोजीही या ट्विटमध्ये त्यांनी वापरले आहेत.