कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा!


पुणे – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून नव्या कोरोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचे दिसून येत आहे. पण, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहिम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.

लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी काही राज्यांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोना लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्युटने देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.


आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील माहिती सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली असून अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले पत्रकच शेअर केले आहे. देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणे फार आवश्यक आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने हेच साध्य करण्यासाठी शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणे यामुळे शक्य होणार असल्याचे अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातील भारतामधील Schott Kaisha ही महत्त्वाची कंपनी आहे. शॉट कायशाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सीरम इस्टिट्युट औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे. यामध्ये लसींच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या व्हायल्सचा समावेश आहे.