हिमाचल मधील ऑफबीट पर्यटन स्थळे

करोना काळात घरात बसून कंटाळलेले लोक आता मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल. पण लोकप्रिय पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी, गोंगाट नको असेही वाटत असेल तर काही खास ऑफबीट पर्यटन स्थळांचा विचार तुम्ही करू शकता.

हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटनासाठी हॉट स्पॉट राहिले आहे. पण सिमला, कुलू मनाली, धर्मशाला या लोकप्रिय स्थळांवर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे करोना संक्रमणाची भीती आहेच. पण हिमाचल मधली फारशी माहिती नसलेली काही स्थळे तुमचा पर्यटनाचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकतात. अशीच काही ही स्थळे.

पांगी व्हॅली हे असेच एका नितांत रमणीय आणि शांत स्थळ. चंबा जिल्यात समुद्रसपाटी पासून सात ते अकरा हजार फुट उंची पर्यंत वसलेल्या विविध छोट्या छोट्या गावांचा हा परिसर. उंच डोगर दर्यांच्या कुशीत चिनाब नदीच्या खोऱ्यात वसलेली अनेक गावे. शांत मनोहर परिसर आणि निसर्ग सौंदर्याची लयलूट असलेल्या हा भाग नक्की पाहू शकता. पीर पंजाल आणि झान्स्कर पर्वत रांगा तुमच्या मनाला भुरळ घालतील यात शंका नाहीच. जून ते ऑक्टोबर काळ येथे जाण्यासठी उत्तम. येथिल पहाडी समाजात अनेक उत्सव साजरे होतात. त्यात लोकनृत्ये, लायन डान्स, मास्क डान्स पाहण्यासारखे. मिंधाल देवी मंदिर पाहण्यासारखे.

राजगुंध हे पॅराग्लायडिंग साठी फेमस असून बीर बिलिंग व बारोट घाटी मध्ये वसलेले आहे. हा परिसर अतिशय सुंदर असला तर सहज जाण्यासारखा नाही. थोडे ट्रेकिंग, थोडी पायपीट करून येथे जाण्याची तयारी हवी. धौलाधार पर्वत रांगांचा हा परिसर अतिशय सुंदर आहे.

सँज व्हॅली कुल्लू पासून ४५ किमी वर असलेला हा परिसर फारसा प्रसिद्ध नाही त्यामुळे येथे अनटच ब्युटीचा अनुभव घेता येतो. चारी बाजूनी उंच हिमाच्छादित पर्वत रांगा, दाट जंगले, शुध्द स्वच्छ हवा असलेल्या या परिसरात प्रामुख्याने आदिवासी वस्ती आहे. जून ते ऑक्टोबर हा काळ येथे जाण्यासाठी उत्तम. बाकी वेळा तुफान बर्फ पडते. हिरवीगार कुरणे असलेल्या या भागात शून्ग्चुल महादेव मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.