नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिका ‘मिशन ११४’ ची जबाबदारी

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘ मिशन ११४’ ची जबाबदारी सोपविली गेली असल्याचे समजते. भाजपने राणे यांच्या १९ ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ ला कसा प्रतिसाद मिळतो यावर सर्व लक्ष केंद्रित केले असून भाजपचे चार नेते विविध भागात जन आशीर्वाद यात्रा काढून जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठीची ही मोर्चे बांधणी असल्याचे सांगितले जात आहे.

राणे यांची यात्रा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. राणे मुंबई विमानतळावरून कुलाबा येथपर्यंत जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. पुढच्या वर्षी बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपला किमान ११४ जागा जिंकून देण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी राणे यांच्यावर सोपविली आहे. शिवसेनेचा पराभव करण्याची जबाबदारी सुद्धा राणे यांच्यावरच आहे. राणे पूर्ण ताकदीनिशी हे मिशन हाती घेत आहेत असे सांगितले जात आहे.

सात दिवसांची ही जन आशीर्वाद यात्रा १७० पेक्षा जास्त स्थानांवर जाणार असून मुंबई बरोबर कोकणात सुद्धा जाणार आहे असे समजते.