तालिबानी अत्याधुनिक शस्त्रे, ड्रोन, विमानांनी सज्ज

तालिबानी संघटनेने अफगाणिस्थानवर ताबा केल्यानंतर तिथे उसळलेल्या गोंधळाच्या बातम्या येत आहेतच पण लक्षात आलेली विशेष बाब अशी की तालिबानी संघटनेकडे पूर्वी जी हत्यारे नव्हती तीही आता त्याच्या तैनातीत हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार योजनाबद्ध रीतीने तालिबानी लढाऊ विमाने, ड्रोन, अत्याधुनिक टँक यांची जमवाजमव अगोदर पासूनच करत होते. त्यात अमेरिकी सैन्याने घाईगडबडीने अफगाणिस्थान सोडल्याने त्यांची मागे राहिलेली अनेक शस्त्रे सुद्धा तालिबानी संघटनेच्या हाती लागली आहेत. यामुळेच अफगाणिस्थानवर सहज ताबा मिळविणे त्यांना शक्य झाले असे सांगितले जात आहे.

तालिबानी संघटना त्यांच्या सोशल मिडिया अकौंटवरून तालिबानी लढवय्यांनी जप्त केलेली हत्यारे, शस्त्रे यांचे व्हिडीओ शेअर करत आहे. आंतरराष्टीय मिडियाच्या रिपोर्ट नुसार तालिबानच्या हातात लहान अंतराच्या १३ मोर्टार, १७ होवित्सर तोफा, डझनावारी चिलखती वाहने, ७०० पेक्षा अधिक ट्रक, सुपर डूकान विमाने, एमआय १७ युटिलिटी हेलिकॉप्टर, एमआय २४ अॅटॅक हेलीकॉप्टर, अॅसॉल्ट रायफल्स बरोबरच एम १६, एम ४ ई रायफल्स सुद्धा आहेत. एम २० लाईट मशीनगन्स आणि अत्याधुनिक ट्रक्स व माईन प्रोटेक्टेड वाहने आहेत. गस्ती ड्रोन आहेत.

पाकिस्तान कडूनही तालिबानला शस्त्र पुरवठा सुरु असल्याचे सांगितले जात असून तालिबानी टी ६२ मिडीयम टँक्सचा वापर सुद्धा करत आहेत.