केंद्राची करोना अँटीजेन किट निर्यातीवर बंदी

देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. तिसरी लाट येऊ शकते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सोमवारी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून रॅपिड अँटीजेन टेस्ट किटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरीन ट्रेड तर्फे सरकारच्या नव्या निर्यात धोरणाव्बद्दल माहिती दिली गेली आहे.

त्यानुसार आरएटी किट बरोबरच प्रयोगशाळेत करोना चाचणी साठी जी रसायने लागतात त्या रसायनांच्या निर्यातीवर सुद्धा निर्बंध घातले गेले आहेत. आज घडीला देशात करोना टेस्ट साठी आरटीपीसीआर आणि आरएटी किटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आरटीपीसीआर मुळे करोना विषाणूची अचूक माहिती मिळते तर आरएटीचा वापर त्वरित चाचणी रिपोर्ट कळण्यासाठी होतो.

देशात करोना लसीकरण ५५ कोटींपेक्षा अधिक झाले असून सोमवारी ८१ लाख नागरिकांना लस दिली गेली आहे. गेल्या १५ दिवसात ७.५ कोटी नागरिकांना लस दिली गेली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी ट्विटरवर दिली आहे.