महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव करणार तृणमूलमध्ये प्रवेश


नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला महिला राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी रामराम केला असून त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला आहे. त्या आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या आणि राहुल गांधींच्या जवळच्या नेत्या म्हणून सुष्मिता देव या मानल्या जात होत्या. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला एक मोठा झटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळच्या आसामच्या असणाऱ्या सुष्मिता देव यांच्याकडे त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्रिपुरामध्ये बंगाली भाषिक लोकांची संख्या मोठी असल्याने पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचं समजतंय.

आपल्या सदस्यत्वाचा सुष्मिता देव यांनी रविवारी राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्याला विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. सुष्मिता देव यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मी आशा करते की जनसेवेचा नवा अध्याय सुरु करताना आपल्या शुभेच्छा नेहमी माझ्यासोबत असतील.

सुष्मिता देव यांचे वडील कै. संतोष मोहन देव हे पाच वेळा आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तर दोन वेळा त्यांनी पश्चिम त्रिपुरा या लोकसभेच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. नंतरच्या काळात 2004 साली सिलचर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व हे सुष्मिता देव यांनी केले.

त्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. असे सांगितले जाते की, काँग्रेसने सीएएवर घेतलेल्या मुद्द्यावरून त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती. कारण सुष्मिता देव ज्या बराक व्हॅली मधून येतात त्या ठिकाणच्या बंगाली हिंदू नागरिकांचा केंद्र सरकारच्या या कायद्याला पाठिंबा होता.