एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने काम करावे – वर्षा गायकवाड


हिंगोली : प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र हा देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात खूप मोठी स्पर्धा आहे. यासाठी शासनाने सर्व सुविधा, ज्ञान, तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञान आत्मसात करुन ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित ऑनलाईन शिक्षक स्पर्धा पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार आणि महाआवास अभियान ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पालकमंत्री गायकवाड या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपणा सर्वांसाठी मागील दीड वर्ष हे असाधारण आणि वेगळे होते. कोविडमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली . सह्याद्री चॅनल व गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून आपण ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. हिंगोली जिल्हा परिषदेने राबविलेली ऑनलाईन शिक्षक स्पर्धा ही अभिनंदनीय असून असेच उपक्रम यापुढेही घेण्यात यावे, असे आवाहन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या जागतीक युगात खूप मोठी स्पर्धा आहे. यासाठी शासनामार्फत सर्व सुविधा, ज्ञान, तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांना आकार देवून त्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञान आत्मसात करुन ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणा-या सुविधा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकांनी करावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपला उत्साह पुरस्कारापुरता न ठेवता असाच कायम ठेवला पाहिजे. आपणाकडे उद्याचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असून हेच विद्यार्थी महाराष्ट्राचा नावलौकिक, गौरव जगभरात घेऊन जातील. विविध माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरु राहील यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावा.

जिल्हा परिषदेने ऑनलाईन शिक्षक स्पर्धा, महाआवास योजना असे विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिनंदन करुन पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. शिक्षक स्पर्धा, महाआवास योजना स्पर्धा घेऊन त्याचे वितरण आज करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने 19 हजार मंजूर घरकुलांपैकी 75 टक्के घरकुलाचे काम पूर्ण करुन मराठवाड्यात पहिला आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी यावेळी दिली.

या स्पर्धेमुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचा-यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून इतरापेक्षा वेगळे काय करता येते हे त्यांनी या स्पर्धेत दाखवून दिले आहे. कोरोना परिस्थितीमुळे आलेली मरगळ दूर स्फूर्तीने विद्यार्थी घडविण्याचे काम करण्यासाठी ही शाळा लवकरात लवकर सुरु होवो आणि विद्यार्थी बहरुन जावो अशी प्रार्थना पुरस्कारप्राप्त शिक्षिका अर्चना पांडे यांनी आपले मनोगतात व्यक्त केली. प्रास्ताविकात शिक्षणाकारी संदीप सोनटक्के यांनी ऑनलाईन शिक्षक स्पर्धा आयोजनाची भूमिका विशद केली.

यावेळी वादविवाद स्पर्धा, कोविड काळातील शैक्षणिक उपक्रमाचे सादरीकरण, इयत्ता पहिली ते 10 वी पाठ्यपुस्तकातील कविता गायन, पोस्टर रांगोळी, स्टोरी टेलींग कंपलेशन इंग्लीश, शैक्षणिक व्हिडिओ, सामान्य ज्ञान, वैयक्तीक नृत्य, गणित-विज्ञान स्पर्धा, मी घडवलेली शाळा सादरीकरण (फक्त मुख्याध्यापकासाठी), बडबड व बाल गीत सादरीकरण (महिला शिक्षकासाठी), सामुहिक नृत्य या प्रत्येक विषयातील प्रथम येणाऱ्या पाच शिक्षकांचा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीप्रत्र देवून गौरविण्यात आले. तसेच कोरोनाच्या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टरांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महाआवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार औंढा पंचायत समितीला, द्वितीय हिंगोली तर तृतीय कळमनुरी पंचायत समितीला मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार वसमत तालुक्यातील अनुक्रमे टेंभूर्नी, गिरगाव, हयातनगर या गावाला देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील अनुक्रमे नरवाडी, मसोड, शेनोडी या गावाला मिळाला. ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणाऱ्या उत्कृष्ट वित्तीय संस्थांचा प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे महाराष्ट्र ग्रामीण बँक, औंढा नागनाथ, स्टेट बँक ऑफ इंडिया, जवळा बाजार यांना देण्यात आला.

राज्य पुरस्कृत आवास योजनेचा सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार प्रथम औंढा नागनाथ , द्वितीय वसमत आणि तृतीय हिंगोली तालुक्याला देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये प्रथम वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, द्वितीय औंढा तालुक्यातील येहळेगाव, तृतीय पुरस्कार हिंगोली तालुक्यातील खेर्डा या गावाला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार कळमनुरी तालुक्यातील अनुक्रमे पार्डी, कुंभारवाडी, जामगव्हाण या गावाला मिळाला आहे. या सर्व पुरस्काराचे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. याबरोबरच महाआवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.