महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांला जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – उद्धव ठाकरे


मुंबई :- कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

या संवादात उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आमी परिवाराचे संयोजक संतोष करंडे (अमेरिका), ज्येष्ठ विचारवंत संदीप देसले (इजिप्त), अलअदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख, उद्योजक डॉ. धनंजय दातार(दुबई), उत्कर्ष बल्लाळ (ओमान), विशाल गायकवाड (रियाध), संजय पाटील (कतार), लेफ्टनंट कर्नल सचिन टिळेकर (ऑस्ट्रेलिया), तेजस्विनी डोळस (अबुधाबी), मृदुला जोशी (कॅनडा), धवल नांदेडकर (फुजैराह), प्रीती पाटील (युनायटेड किंगडम), प्रज्ञा आगवणे (शारजाह), ज्योती नेने-त्रिवेदी (केनिया), मोहम्मद नदीम (सऊदी अरेबिया), डॉ. अनघा कुलकर्णी (बहारीन), सुशांत सावर्डेकर (दोहा), उल्का नागरकर (शिकागो) सहभागी झाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जगभरातून आपण शुभेच्छा देत आहात. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे. आपण मायभूमीपासून दूर गेलात, पण तुमची पाळेमुळं इथचं आहेत. मनाने इथेच आहात, याचा आनंद आहे. जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येतो आहे, हे आशा पल्लवित करणारे आहे. मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे.

आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्यादृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणामध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत आहोत. मुंबई मनपा शाळांच्या गुणवत्तावाढीमुळे आता प्रवेशासाठी रांग लागू लागली आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचेही स्वागत केले जाईल.

आपला शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आपल्या आयुष्याची गुंतवणूकच शेतीत करतो. पण तो पावसाच्या अनियमिततेमुळे हताश होतो. त्याला कधी दुष्काळाचा, तर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो. मेहनती शेतकऱ्याला या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मालाला हमी नव्हे तर हमखास भाव मिळेल. त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल. उद्योग जसा आखीव-रेखीव असतो, तसेच त्याला संघटीत करण्याचा प्रय़त्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचा पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे.

ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम भोगतो आहे. त्यासाठी आता आम्ही आपण ई-व्हेईकल्सचे धोरणही आणले आहे. अशा कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, औषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचना, नव्या प्रकल्प, संकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गत दीडवर्षातील महाराष्ट्रातील कोविडशी झूंज, वादळ आणि अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पूराचा फटका यांचा उल्लेख करून, या आव्हानांवर मात करून महाराष्ट्र पुढे जात असल्याचे सांगितले.

उद्योग मंत्री देसाई म्हणाले, आपण सर्वांनी सातासमुद्रापार जाऊन महाराष्टाची मुद्रा उमटवली आहे. आपला प्राणप्रिय भगवा फडकवला आहे. आप-आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. जगभरातल्या आंतरराष्ट्रीय कंपन्याचे सीईओ भारतीय आणि महाराष्ट्राचे आहात, याचा अभिमान आहे. त्या-त्या देशांची आर्थिक मराठी बंधु-भगिनीचा हातभार लागतो आहे, याचे कौतुक आहे.

तुम्ही तिथे प्रामाणिकपणे काम करताना, मातृभुमीचे ऋण, ऋणानुबंध विसरलेला नाहीत, हे महत्त्वाचे आहे. अनिवासी महाराष्ट्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहेत. कोरोनाचे मोठे संकट असताना, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सावरण्याची जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्र्याच्या शब्दाखातर महाराष्ट्राने शिस्त, अपेक्षा, सूचना महाराष्ट्राने तंतोतंत पाळल्या. त्यामुळे महाराष्ट्र खचला नाही.

उद्योग, व्यापाराची चक्रे अविरत सुरु राहीली. ती कुठेही थांबली नाहीत. जगभर विखुरलेल्या उद्योजकांच्या कल्पनांचे, संकल्पनांचे स्वागतच आहे. उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी आम्ही पायघड्या घातल्या आहेत. त्यासाठीच्या विविध धोरणांचीही मंत्री देसाई यांनी माहिती दिली.उद्योजक डॉ. दातार यांच्यासह या संवादात सहभागींनी कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री. ठाकरे यांनी उत्कृष्ट काम केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

या संवादाच्या दरम्यानच केनियातून ज्योती नेने-त्रिवेदी यांनी त्यांचे वडील डॉ. नेने यांचे बार्शी (जि. सोलापूर) येथील नर्गीस दत्त कॅन्सर रिसर्च रुग्णालयामध्ये सोयी-सुविधांमध्ये वाढ करून, हे रुग्णालय ग्रामीण जनतेच्या सेवेत रुजू करण्याबाबत विनंती केली. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगेचच या रुग्णालयाबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले. तसेच लवकरात लवकर हे रुग्णालय पुन्हा नव्या दमाने रुजू करण्यात येईल, असा विश्वास दिला.

शारजाहातून मिलिंद विनोद यांनी एक शाळा दत्तक घेऊन ती अद्ययावत तंत्रज्ज्ञानाने आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी करण्याची तयारी दर्शविली. मुंबई महापालिकेकडून दादर येथील एका मार्गाला ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले आणि आभारही मानले.