गृहमंत्र्यांनी दिले मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेचे आदेश


नवी मुंबई : नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नी संजीवनी काळे यांनी शारिरीक, मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप काळे यांना अटक केली नसल्यामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत.

आज पोलीस आयुक्तांलयाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली.

दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी गृहमंत्र्यांनी काळेला अटक करू, असे आश्वासन महिला शिष्टमंडळाला दिली. यानंतर पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांनीही गजानन काळेला पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आल्या असून लवकरच अटक होईल, असे स्पष्ट केले.