सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यानंतर पक्षनेतृत्वावर भडकले कपिल सिब्बल


नवी दिल्ली – आज सकाळी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आयुष्यातील ‘न्यू चॅप्टर’चा सूचक इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या आयुष्यातला हा न्यू चॅप्टर म्हणजे तृणमूल काँग्रेस असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसला रामराम ठोकत सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या पार्श्वभूमीवर पक्षनेतृत्वावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी सुष्मिता देव यांनी एक पत्र पाठवले आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावे, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे.

गेल्या तीन दशकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबतचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. तुम्ही सर्वजण माझ्या या प्रवासात माझ्यासोबत होता. मॅडम, तुम्ही मला दिलेल्या संधीसाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुमचे वैयक्तिकरीत्या आभार मानते. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा असल्याचे आपल्या पत्रात सुष्मिता देव यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, या सुष्मिता देव यांनी राजीनामा दिल्यानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाला खडसावले आहे. आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला आहे. जेव्हा पक्षाचे तरुण नेते सोडून जातात, तेव्हा आमच्यासारखे ज्येष्ठ पक्षाला मजबूत करण्यात कमी पडल्याचे खापर फोडले जाते. पक्ष डोळे मिटून पुढे जात राहातो, असे ट्वीट कपिल सिब्बल यांनी केले आहे.

काँग्रेसमधील एकूण २३ महत्त्वाच्या नेत्यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. यामध्ये पक्षांतर्गत व्यवस्था सुधारण्यासंदर्भात आणि नेतृत्वामधील सुधारणांविषयीही सल्लावजा मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, सुष्मिता देव यांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसकडून प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्याशी बोलल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले. सुष्मिता देव यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. पण त्यांचा फोन बंद आहे. त्या एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्या होत्या, कदाचित आजही आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अजूनही त्यांच्याकडून कोणतेही पत्र मिळालेले नसल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.