इतकी आहे तालिबानची कमाई आणि येथून मिळतो त्यांना पैसा

अफगाणिस्थानची राजधानी ताब्यात घेऊन तालिबानी सैनिकांनी देशावर कब्जा मिळविला असतानाच तालिबानी संघटनेची कमाई काय असावी आणि त्यांना कुठून पैसे मिळतात याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या २०११ सालच्या एका अहवालात तालीबान्यांची त्यावेळची कमाई ३०० दशलक्ष डॉलर्स होती, आता ही कमाई १ अब्ज ५० कोटी डॉलर्स वर गेली आहे. १०० दिवसाच्या आत अफगाणी सेनेचा पाडाव करून तालिबानी दहशतवाद्यांनी देशावर कब्जा मिळविला आहे.

तालिबानी संघटनेला पैसा कुठून पुरविला जातो या प्रश्नांचे उत्तर जून २०२१ च्या एका अहवालात मिळते. या अहवालानुसार तालिबान अमली पदार्थ तस्करी व्यवसायात असून त्यातूनच त्यांना ४६० दशलक्ष डॉलर्स वर्षाला मिळतात. शिवाय ज्या जागा तालिबान ताब्यात घेतात तेथील नागरिकांकडून जबरदस्त कर वसुली करतात.

एका गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार लढाऊंची भरती, फंडिंग, दारूगोळा किंवा शस्त्रखरेदीसाठी तालिबानीना कधीच संघर्ष करावा लागत नाही. त्यांना देणग्या मोठ्या प्रमाणावर मिळतात. युएनच्या म्हणण्यानुसार गैरसरकारी संस्था, चॅरिटेबल फाउंडेशन्स, तालिबानचे श्रीमंत समर्थक यांच्या कडून त्यांना प्रचंड पैसा पुरविला जातो. पाकिस्तान आणि इराण सुद्धा त्यात सामील आहे असा आरोप होतो पण त्याचा स्पष्ट पुरावा अजून मिळालेला नाही.

जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार २०१८ पर्यंत अफगाणी सरकारने खर्च केलेल्या ११ अब्ज डॉलर्स पैकी ८० टक्के रक्कम विदेशी साहाय्य घेण्यासाठी खर्च केली पण तालिबानी मात्र काहीही मेहनत न करता यापेक्षा कितीतरी अधिक पैसा मिळवत आहेत.