दहशतवादी बुरहानच्या वडिलांनी फडकाविला तिरंगा, गायले राष्ट्रगीत

देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनी जम्मू काश्मीर मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याचे वडील मुजफ्फर यांनी त्राल या त्यांच्या गावात तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गायले. या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुजफ्फर त्राल येथील मुलींच्या सरकारी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत आणि पाच वर्षानंतर त्यांनी प्रथम शाळेत तिरंगा फडकावून त्याला मानवंदना दिली असे समजते.

जम्मू काश्मीर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षात प्रथमच काश्मीर खोऱ्यात तणावमुक्त वातावरण आहे. इंटरनेट, मोबाईल बंदी नाही. बुरहान वानी ८ जुलै २०१९ मध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता आणि तेव्हापासून काश्मीर खोरे अशांत होते. पाच महिने ही परिस्थिती होती आणि त्या काळात १०० हून अधिक नागरिक आणि सैनिक दहशतवाद्यांनी ठार केले होते. हजारो जखमी झाले होते.

बुरहान १५ व्या वर्षीच हिजबुल मुजाहिद्दिन या अतिरेकी संघटनेत सामील झाला होता. त्याला पाकिस्तान मध्ये प्रशिक्षण दिले गेले होते आणि नंतर तो त्राल मध्ये डोंगरात राहत होता. घाटीतील युवकांना फूस लावून अतिरेकी संघटनेत तो सामील करून घेत होता आणि राज्यात दहशतवादी कारवाया करत होता. सुरक्षा दल सैनिकांची शस्त्रे खेचून घेण्यासठी तो युवकांना प्रोत्साहन देत असे यामुळे हे युवक परत समाज प्रवाहात सामील होऊ शकत नसत. या कामी सोशल मीडियाचा अतिशय कुशल वापर बुरहान करत असे आणि असे करणारा तो पहिला अतिरेकी होता.

बुरहान चकमकीत मारला गेल्यावर त्याच्या कुटुंबाने सुरक्षा दलाविरुद्ध निदर्शने केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी बुरहानचे वडील मुजफ्फर यांनी तिरंगा फडकावला आहे.