कुणी आणि कधी दिले हे देशभक्तीचे नारे

देशवासियांच्या मनात एका क्षणात स्फुरण निर्माण करण्याची ताकद येते ती देशभक्ती संबंधातील नारे गुंजतात तेव्हा. राष्ट्रगीत संपताच ‘भारत माता की जय’ नारा दिला जातोच. पण असे हे नारे कुणी आणि कधी प्रथम दिले याची माहिती आपल्याला बरेचदा नसते. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने ही माहिती करून घेणे उचित ठरेल.

भारत माता की जय हा नारा राष्ट्रगीत संपले की उत्स्फूर्ततेने दिला जातो आणि मनात देशभावना जागृत होते. हा नारा सर्वप्रथम किरणचंद्र बंदोपाध्याय यांनी ‘भारत माता’ नावाच्या नाटकात दिला होता. विशेष म्हणजे ‘ मादरेवतन हिंदुस्तान जिंदाबाद’ या उर्दू वाक्याचे हे भाषांतर आहे. १८७३ मध्ये अजीम उल्लाखान यांनी ही उर्दू घोषणा दिली होती.

जयहिंद हा सर्वाधिक वेळा वापरला जाणारा नारा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ते ब्रीद वाक्य. हिंदसेनेचे मेजर आबिद हसन सफरानी यांनी हे ब्रिद वाक्य दिले. आझाद हिंद सेनेचे हे घोषवाक्य स्वातंत्र्यानंतर देशात पोलीस आणि सेना यांनी सर्वाधिक वापरले.

वंदे मातरम हे वाक्य बंगाली कादंबरीकार आणि स्वातंत्र सेनानी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८८२ मध्ये प्रथम वापरले. रविंद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये इंडियन नॅशनल कॉंग्रेस अधिवेशनात त्याचा वापर केला आणि नंतर ते राष्ट्रीय गीत बनले.

सत्यमेव जयते हे संस्कृत सुभाषित मुंडक उपनिषदातून घेतले गेले आहे. संस्कृत पंडित आणि स्वातंत्र सेनानी पंडित मदनमोहन मालवीय यांनी १९१८ मध्ये हे ध्येयवाक्य लोकप्रिय केले आणि आज ते राष्टीय प्रतिक बनले आहे.

इन्किलाब जिंदाबाद हे स्फुरण देणारे वाक्य देशभक्त भगतसिंग यांनी १९२९ मध्ये प्रथम, असेम्ब्ली मध्ये बॉम्ब फेकताना उच्चारले आणि नंतर ते क्रांतीचे प्रतिक बनले. आजही बहुतेक सर्व चळवळ करणारया संघटना हे वाक्य वापरतात. महात्मा गांधी यांनी दिलेली, १९४२ च्या चले जाव चळवळीची ‘ करो या मारो’ घोषणा, ७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांनी दिलेली संपूर्ण क्रांती घोषणा, सुभाष बाबूंची ‘ तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ ही घोषणा सुद्धा लोकप्रिय स्लोगन मध्ये समाविष्ट आहेत.