उद्धवपुत्र तेजस ठाकरे राजकारणात येणार, मिळाले संकेत

राजकारणी नेत्यांची मुले राजकारणात येणे ही तशी सामान्य बाब आहे आणि आज अनेक राजकारणी नेत्याची पुढची पिढी राजकारणात सक्रीय सुद्धा आहे. सध्या आणखी एका राजकारणी पुत्राची राजकारण प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे द्वितीय पुत्र तेजस राजकारणात उतरत असल्याचे संकेत दिले जात आहेत. तेजस यांच्या २६ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून शिवसेना मुखपत्र सामना मध्ये तेजस यांना शुभेच्छा देणारी जाहिरात त्यासाठी महत्वाची मानली जात आहे.

ही जाहिरात ठाकरे कुटुंबाने नाही तर शिवसेना सचिव मिलिंद ठाकरे यांनी दिली असून जाहिरातीच्या एका कोपऱ्यात शिवसेनेचे चिन्ह, दुसऱ्या कोपऱ्यात उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. ‘ ठाकरे परिवाराचा विव्हियन रिचर्ड्स’ असे तेजस यांचे वर्णन या जाहिरातीत केले गेले आहे. यामुळे तेजस यांचे राजकारण प्रवेशाचे संकेत म्हणून या कडे पाहिले जात आहे.

शिवसेनेच्या कार्यक्रमात तेजस फारसे दिसत नाहीत. मात्र ठरविले ते करणारे, स्पष्ट बोलणारे आणि कडक व्यवस्थापन हे त्यांचे गुण असल्याचे सांगितले जाते. तेजस यांची स्वतःची खास ओळख आहे. वन्य जीव संरक्षण, पर्यावरण आणि संशोधक अशी त्यांची ओळख आहे. प. घाटात अनेक प्रकारचे खेकडे, साप, मासे त्यांनी शोधून काढले असल्याचे सांगितले जाते. अनेक प्रजातींना त्यांचे नाव दिले गेले आहे. २०१६ मध्ये त्यांनी पाच नव्या प्रजाती शोधल्या होत्या आणि २०१९ मध्ये पुन्हा दोन नव्या प्रजाती शोधल्या. आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांच्या या शोधांची नोंद घेतली गेली आहे.