पहिल्या स्वातंत्र्यदिनी फडकलेला तिरंगा आजही येतो पाहता


भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फडकविला गेलेला पहिला तिरंगा आजही जतन केला गेला आहे. २६ जानेवारी २०१३ पासून तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला गेला असून या प्रसंगातील हा एकमेव झेंडा आत्तापर्यंत सुरक्षित राहिला असल्याचे समजते.चेन्नईतील सेंट जॉर्ज संग्रहालयात तो पाहता येतो.

या ध्वजाचा कांही भाग जीर्ण झाला आहे.राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाने या ध्वजाची पूर्ण काळजी घेतली असून हा ऐतिहासिक वारसा जतन करता यावा यासाठी विज्ञानाची मदत घेतली आहे. हा झेंडा ठेवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून एक बॉक्स तयार केली गेली आहे. ही पेटी लाकूड व काचेपासून बनविली गेली असून तिच्या चारी बाजूंनी सिलीका जेलच्या सहा बॉक्स ठेवल्या गेल्या आहेत. या बॉक्स हवेतील आर्द्रता शोषून घेतात व तापमान नियंत्रणात ठेवतात. या ध्वजाचे नुकसान थेट प्रकाशापासून होऊ नये म्हणून त्याला कमी प्रकाशात ठेवण्यासाठी लक्स मीटरचा वापर केला गेला आहे. धूळीपासून संरक्षणासाठी खास व्यवस्था आहे.

१२ बाय ८ फुटाचा हा तिरंगा पहिल्या स्वातंत्र्यदिनी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी फडकविला गेला होता मात्र तो कुणी फडकविला याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment