१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजवंदनामध्ये हे आहेत फरक


फोटो सौजन्य एशिया नेट
आपल्या देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिन साजरा होतो आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दोन्ही दिवशी ध्वजवंदन केले जाते मात्र त्यात काही फरक आहेत. त्याबाबत अनेकांना माहिती नाही.राष्ट्रध्वज हा प्रत्येक राष्ट्राचा मानबिंदू असतो आणि त्या त्या देशाची ती ओळख असते. या राष्ट्रध्वजाची शान राखणे हे केवळ सैनिकच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते.

आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा आहे. स्वातंत्रदिनाला दिल्लीच्या ऐतिहासिक प्राचीन लाल किल्ल्यावर पंतप्रधान झेंडावंदन करतात. पहिल्या स्वातंत्रदिनी ब्रिटीश झेंडा खाली उतरवून आपला राष्ट्रध्वज त्याजागी चढविला गेला आणि मग तो फडकाविला गेला. झेंडा खालून वर चढवून वर नेऊन फडकविण्याचा या कृतीस ध्वजारोहण म्हटले जाते तर २६ जानेवारीला ध्वज वरच्यावर फडकाविला जातो आणि हे ध्वजवंदन राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर होते.

१५ ऑगस्ट हा आपल्याला स्वातंत्र मिळाले तो दिवस तर २६ जानेवारीला आपले संविधान लागू झाले. १५ ऑगस्टला ध्वजवंदनाचा मान पंतप्रधानांना असतो कारण ते देशाचे प्रमुख राजनितीक असतात तर २६ जानेवारीला हा मान राष्ट्रपतींचा असतो कारण ते देशाचे संवैधानिक प्रमुख असतात. २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र भारताची घटना लागू झाली. त्यापूर्वी देशाला घटना नव्हती आणि राष्ट्रपती नव्हते.

१५ ऑगस्टच्या ध्वजारोहण समारंभानंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात पण या दिवशी परेड होत नाही आणि १४ ऑगस्टरोजी सायंकाळी राष्ट्रपती देशाला संदेश देतात. २६ जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवितात पण भाषण करत नाहीत. या दिवशी राजपथावर अतिशय देखणे संचलन होते. त्यात भारताच्या जल, थल आणि वायुसेना त्यांची ताकद दाखवितात तसेच अनेक राज्यांचे रथ विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला बाहेरच्या देशातून कुणी प्रमुख पाहुणे बोलावले जात नाहीत तर २६ जानेवारीला बाहेरच्या देशातील सन्मान्य नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.

Leave a Comment