या स्वातंत्र्यदिनी ठेऊ या यांचीही आठवण…


आज आपण आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देशभरामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महिलांचा ही मोठा सहभाग होता. आपल्या पुरूष सहकाऱ्यांच्या बरोबर, खांद्यास खांदा भिडवून या महिला स्वातंत्र सैनिक स्वराज्याच्या अनेक आंदोलनांमध्ये उभ्या राहिल्या, लाठ्यांचे आघात मोठ्या हिमतीने सहन केले, तुरुंगवास ही भोगला. अश्याच काही वीर महिला स्वातंत्र्य सैनिकांबद्दल थोडेसे..

कॅप्टन लक्ष्मी सेहगल : कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी सेहगल व्यवसायाने डॉक्टर होत्या. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेच्या महिला तुकडीच्या त्या नेत्या होत्या. या महिलांच्या तुकडीस राणी झासी रेजिमेंट असे नाव दिले गेले होते. रिव्हॉल्वर आणि तलवारबाजी मध्ये निष्णात असणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी यांनी आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला. १९४३ ते १९४५ या काळामध्ये तत्कालीन बर्मा प्रांतामध्ये राहून कॅप्टन लक्ष्मी स्वराज्याच्या चळवळीमध्ये कार्यरत होत्या. १९४६ मध्ये ब्रिटिशांनी कॅप्टन लक्ष्मी यांना कैद करून भारतामध्ये आणले. पण त्यानंतर लवकरच त्यांची सुटका करण्यात आली. १९९८ साली त्यांना पद्मविभूषण हा सम्मान देऊन भारत सरकारतर्फे गौरविण्यात आले.

कनकलता बरुआ : आसाम मध्ये “ भारत छोडो “ चळवळीमध्ये भाग घेऊन, हातामध्ये भारताचा ध्वज घेऊन मृत्युला सामोरी गेलेली कनाकलता अवघी सत्राच वर्चांची होती. १९२४ मध्ये जन्मलेली कनकलता अनाथ होती. अवघ्या तेराव्या वर्षी कनकलतेने आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी शिक्षण सोडले. त्याकाळी देशामध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीने तसेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनी प्रभावित होऊन कनकलताने देखील या चळवळीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आसामातील गोहपूर सब डिविजन इथल्या तरुणांनी तेव्हा ‘मृत्यू वाहिनी ‘ हे आत्मघातकी पथक स्थापन केले होते, त्यामध्ये कनकलता सामील झाली. २० सप्टेंबर १९४२ साली या पथकाने ब्रिटीश पोलिसांच्या अधीन असलेल्या स्थानिक पोलिस चौकीवर तिरंगा फडकविण्याचे ठरविले. साधारण पाचशे लोकांचा जम्माव यासाठी पोलिसांकडे रवाना झाला. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी जमावास रोखून धरण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये कनक लतेचा मृत्यू झाला.

प्रीतीलता वड्डेदार : चित्तगोंग येथे असणाऱ्या पहारताली युरोपिअन क्लब वर १९३२ मध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये प्रीतीलता यांचा सहभाग होता. या क्लब मध्ये ‘indians and dogs not allowed’ अशी अपमानजनक सूचना लावली होती. त्या सूचनेच्या विरोधात प्रीतीलता आणि आणि त्यांचे साथीदार उभे राहिले. हा विरोध मोडून काढत पोलिसांनी गोळीबार केला त्यामध्ये प्रीतीलता जखमी झाल्या.

सुभद्रा सिंघ चौहान : ‘ खूब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी’ ह्या ओळी ज्यांच्या कलमातून अवतरल्या त्या सुभद्रा सिंघ चौहान. ‘जालियावाला बाग मे वसंत’ हे त्यांची कविता खूपच लोकप्रिय झाली. त्यांचे पती ठाकूर लक्ष्मण सिंह यांच्याबरोबर ‘झंडा सत्याग्रह’ मध्ये सहभाग घेऊन ब्रिटीश सरकार विरुद्ध चालत असलेल्या असहकार आंदोलनामध्ये सुभद्रा सामील झाल्या. १९२३ मध्ये नागपूर येथे न्यायालयीन कोठडी मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या महिला सत्याग्रही होत्या. त्या वेळेला त्यांचे वय अवघे एकोणीस वर्षांचे होते. त्यांनतर ही त्यांना परत एकदा तुरुंगवास भोगावा लागला. त्या वेळी तुरुंगामध्ये राहून महिला कैद्यांच्या विकासासाठी त्यांनी काम केले. त्यांचे कविता लेखन आणि इतर लेख लिहिणे ही चालू होतेच. साहित्यामधील त्यांच्या योगदानाकरिता त्यांना अखिल भारतीय साहित्य सम्मेलानातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment