कोण होते तिरंगा डिझाईन करणारे पिंगली व्यंकैया


येत्या 15 ऑगस्टला आपण देशाचा 73 वा स्वातंत्रदिन साजरा करणार आहोत. देशभरातील नागरिक आणि सैनिक यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देतील. या ध्वजाचे डिझाईन पिंगली व्यंकैया यांनी केल्याचे आपण जाणतो. पण व्यंकैया याच्याविषयी आपल्याला कमी माहिती आहे.

व्यंकैया यांचा जन्म २ ऑगस्टरोजी आंध्रातील पेनमरू गावात झाला आणि त्याचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. ते महान स्वतंत्र सेनानी होते. तरुण वयात ते मुंबईत आले आणि ब्रिटीश इंडिअन आर्मी मध्ये नोकरीला लागले. त्यांना युद्धात भाग घेण्यासाठी द.आफ्रिकेला पाठविले गेले होते तेथे त्यांच्या म. गांधी यांच्याशी संपर्क झाला आणि हे संबंध वाढत गेले. व्यंकैया यांच्यावर म, गांधी यांच्या विचाराचा मोठा प्रभाव होता आणि त्यातूनच त्यांनी गांधीना आपला वेगळा राष्ट्रध्वज हवा अशी कल्पना सुचविली. गांधीना ती आवडली आणि त्यांनी ध्वजाचे डिझाईन तुम्हीच करा असे सुचविले.

व्यंकैया स्वदेशी परतले आणि त्यांनी रेल्वेत नोकरी घेतली त्यानंतर ते मद्रास प्लेग निर्मुलन कामात सरकारी अधिकारी होते. त्यांना उर्दू, संस्कुत, हिंदी भाषा अवगत होत्या आणि ते जपानी भाषा शिकले होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. स्वदेशी आंदोलनाशी ते निगडीत होते. त्यांनी स्वदेशी कापूस बियाणे तयार केले त्याला व्यंकैया कपाशी या नावाने ओळखले जाते. ते कृषी तज्ञ होते. सतत ५ वर्षे विचार करून त्यांनी तीन रंगी ध्वज तयार केला त्यात अशोकचक्र मधोमध असावे अशी गांधीनी सूचना केली.

सर्वप्रथम हा ध्वज लाल आणि हिरव्या रंगात होता तो नंतर केशरी, पांढरा आणि हिरवा आणि मध्ये निळे अशोकचक्र असा बनला. हा ध्वज १९३१ साली कराची येथील कॉंग्रेस कमिटीमध्ये सादर करण्यात आला आणि याच ध्वजाखाली स्वातंत्र्याची अनेक आंदोलने केली गेली. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळाल्यावर हाच ध्वज राष्ट्रध्वज म्हणून ओळखला जाऊ लागला. व्यंकैया याच्या १३२ व्या जन्मदिवशी तिरंग्यासोबत त्याचा फोटो असलेले पोस्ट तिकीट काढले गेले होते.

Leave a Comment