हे भारतीय स्टँप्स ठरले आहेत बहुमूल्य


साडे चार कोटी रुपये खर्च करायचे ठरवले, तर त्यामध्ये किती तरी वस्तू विकत घेता येतील.. एक आलिशान घर, गाडी, हिरे-माणके, किंवा काही स्टँप्स ? हो.. काही दुर्मिळ स्टँप्सची किंमत देखील कोट्यवधींच्या घरात आहे. ह्या स्टँप्स वर जगप्रसिद्ध असलेल्या व्यक्तिमत्वाचे मुखचित्र आहे. २०१७ साली झालेल्या एका लिलावामध्ये दहा रुपये प्रति स्टँप मूल्य असलेले, महात्मा गांधींचे मुखचित्र असलेले काही दुर्मिळ स्टँप्स जगातील सर्वात बहुमूल्य स्टँप ठरले आहेत. एका खासगी लिलावामध्ये ह्या स्टँपना विक्रमी किंमत मिळाल्याचे समजते. हे चार स्टँप, एक ऑस्ट्रेलियन संग्रहाकाने तब्बल ६६८,५१० डॉलर्स, म्हणजेच तब्बल साडे चार कोटी रुपयांना खरेदी केल्याचे समजते.

२०११ सालामध्ये स्वित्झर्लंड येथील जेनेव्हा येथे असलेल्या ‘डेव्हिड फील्डमन स्टँप ऑक्शन हाउस’ ने महात्मा गांधींचे मुखचित्र असलेला दहा रुपये मूल्याचा स्टँप विक्रमी १४४,००० युरो मध्ये विकला होता. एकच भारतीय दुर्मिळ स्टँप इतक्या मोठ्या किंमतीला पहिल्यांदाच विकला गेला आहे. इतक्या जास्त किंमतीला हे स्टँप विकले जाण्यामागे नेमके काय कारण असू शकेल? तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वप्रथम छापल्या गेलेल्या काही स्टँप्स पैकी हा स्टँप आहे. ह्या शिवाय ह्या स्टँपला आणखी एका घटनेमुळे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधींचे योगदान आपण सर्वच जाणतो. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या सन्मानार्थ एक स्टँप तयार करण्यात येऊन, १९४८ सालच्या सुरुवातीला हा स्टँप प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या कामाची जबाबदारी नाशिक येथील सेक्युरिटी प्रेसकडे सोपविण्यात आली. मात्र हा स्टँप प्रदर्शित होण्यापूर्वीच १९४८ सालच्या जानेवारी महिन्यातच महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. त्यामुळे हे स्टँप लागू झालेच नाहीत. ह्या स्टँपच्या ऐवजी भारत सरकारने महात्मांच्या स्मृती प्रीत्यर्थ नवे स्टँप तयार करवून, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी त्यांचे अनावरण केले.

हे स्टँप्स स्वित्झर्लंडमध्ये तयार करविण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर लागू केलेले हे पहिले स्टँप होते. दीड आणा, साडे तीन आणे, बारा आणे, आणि दहा रुपये असे चार निरनिरळ्या मूल्यांचे स्टँप तयार करविण्यात आले. ह्यांच्यावर ‘बापू’ हा शब्द उर्दू आणि हिंदी भाषांमध्ये लिहिलेला होता. ह्यामध्ये सर्वात विशेष होता, तो जांभळ्या रंगाचा दहा रुपये मूल्याचा स्टँप. ह्यावर ‘सर्व्हिस’ हा शब्द छापला असून हे केवळ शंभर स्टँप्स बनविण्यात आले होते. हे स्टँप्स केवळ संग्रही असण्याच्या उद्देशाने बनविले गेले होते. आजच्या काळामध्ये ह्यातील केवळ आठ स्टँप्स खासगी संग्राहकांकडे आहेत.

Leave a Comment