स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका

15-august
आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा हेतूही कळला नाही आणि स्वातंत्र्याचा अर्थही कळला नाही. स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण खूप मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनात सहभागी असणारांसाठी स्वातंत्र्य हे साध्य होते. त्यांच्या आंदोलनाचे ध्येय स्वातंत्र्य हे होते. म्हणून स्वातंत्र्य मिळताच त्यांच्या मनात कृतकृत्यतेची भावना दाटून आली. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपण सारे काही भरून पावलो अशी त्यांची भावना झाली. पण, महात्मा गांधी यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांसाठी स्वातंत्र्य हे साध्य नव्हते तर साधन होते. त्यांना स्वातंत्र्य हवे होते पण केवळ स्वातंत्र्य किंवा स्वराज्य नको होते. त्यांना सुराज्यासाठी स्वातंत्र्य हवे होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे साधन आहे असे ते म्हणत. ही गोष्ट वेगळ्या शब्दात सांगायची तर असे म्हणता येईल की त्यांना स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य नको होते. त्यांना सामान्य माणसाच्या आयुष्यात काही तरी घडवण्यासाठी स्वातंत्र्य हवे होते. त्यांना परिवर्तनाचे एक साधन म्हणून स्वातंत्र्य हवे होते.

आपण आता स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत पण या औचित्यावर आपण स्वातंत्र्यामागच्या हेेतूवर चिंतन करायला हवे आहे. हे चिंतन केले नाही आणि सुराज्य निर्मितीसाठी काही विचारच केला नाही तर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मिळाले होते. पण त्यापूर्वीची एक हजार वर्षे केवळ युद्धांनी भरलेली होती. देेशाच्या विविध भागात राजे रजवाडे आणि संस्थानिक आपापसात लढत होते आणि आपल्या अधिपत्याखालील जमीन विस्तारित झाली पाहिजे यासाठी रक्तपात करीत होते. भारताचा इतिहास फार मोठा आहे पण या इतिहासातल्या या हजार वर्षात सततच्या लढायांमुळे समाज अस्थिर झाला होता. या अस्थिरतेत वैज्ञानिक प्रगती थांबली. तांत्रिक संशोधन झाले नाही. याच काळात यूरोपात मात्र नवनवे शोध लागून तो खंड प्रगती करीत होता. तो पुढे गेला आणि आपण केवळ लढाया करीत मागे पडलो. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी आपल्या तांत्रिक आणि शास्त्रीय संशोधनातून प्रगत शस्त्रे निर्माण करून आपल्यावर राज्य केले. व्यवस्थापनाचे आणि राज्यकारभाराचेही नवे तंत्र राबवून केवळ पाच लाख ब्रिटीशांनी २० कोटीच्या भारताला गुलाम केले. आपण हजार वर्षांच्या अस्थैर्याची किंमत अशी मोजत होतो. आता आपण स्वतंत्र झालो आहोत ते या हजार वर्षातला आपला प्रगतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी झालो आहोत. या स्वातंत्र्याचा वापर आपल्याला शास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात जगाच्या बरोबरीला येण्यासाठी करायला हवे. त्यासाठी सातत्याने विकासाचाच विचार करायला हवा.

ही प्रगती स्वातंत्र्यातच होत असते. होऊ शकत असते कारण मानव हा केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक आणि आवश्यक गरजांवर जगू शकत नाही. या तर शरीराच्या गरजा आहेत. माणसाच्या मनाला स्वातंत्र्याची भूक असते. ती भूक कसल्याही भौतिक सुविधांनी भरून निघत नसते. स्वातंत्र्याला कसलाही पर्याय नाही. काही साम्यवादी आणि हुकूमशाहीवादी लोक याबाबत मोठा विपरीत विचार मांडत असतात. त्यांच्या मते माणसाला भाकरी दिली की झाले. स्वातंत्र्याची गरजच काय ? स्वातंत्र्य वगैरे सारे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यांच्या या विपरीत विचाराने माणसाला पशूच्या पातळीला आणले आहे. चीनमध्ये कोणालाही आपला विचार मांडण्याची अनुमती नाही. देशाचे भवितव्य कसेे असावे याची चिंता आणि चिंतन सामान्य माणसाने करण्याची काही गरजच नाही. काही मूठभर लोक त्यासाठी समर्थ आहेत. असे हा देश मानतो. त्यांच्यापेक्षा अन्य कोणी विचार करायला लागला आणि ते विचार जाहीरपणाने व्यक्त करायला लागला की त्याला कठोर शिक्षा केल्या जातात. हुकूमशाहीत असे स्वातंत्र्य नसते.

हा मानसिक आणि वैचारिक संघर्ष ‘भाकरी की स्वातंत्र्य ?’ या प्रश्‍नाने चर्चिला जातो. या प्रश्‍नात भाकरी आणि स्वातंत्र्य यात काही तरी द्वंद्व आहे अशी सूप्त मान्यता असते. खरे तर हे गृहित चुकीचे आहे. सामान्य माणसाला दोन्ही हवे असते, भाकरीही हवी असते अणि स्वातंत्र्यही हवे असते. त्याला भाकरीचा हक्क मिळण्यासाठीच स्वातंत्र्य हवे असते. भाकरी हवी की स्वातंत्र्य हवे हा प्रश्‍नच चुकीचा आहे. स्वातंत्र्य हवे आणि भाकरी मिळत नसल्यास आरडा ओरडा करण्यासाठी स्वातंत्र्यही हवे. पण यासोबत हेही लक्षात ठेविले पाहिजे की, स्वातंत्र्याचा अर्थ एवढाच मर्यादित नाही. त्यापलीकडे आहे. आपल्याला कोणा हुकूमशहाने भाकरी मुळात देण्याचेच काही कारण नाही. आपण आपली भाकरी आपल्या कष्टाने कमावणार आहोत. ते कष्ट कसे करावेत हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला हवा असतो. माणूस भाकरीसाठी कष्ट करतोच पण ते करताना मनाचे अनेक आविष्कार घडवत असतो. कधी तरी त्याच्या पल्याड जाऊन भाकरीपेक्षाही काही नवे निर्माण करीत असतो. म्हणून त्याला भाकरी कशी कमवावी याचेही स्वातंत्र्य हवे असते. अन्यथा त्याची उद्योजकता, कल्पकता आणि सृजनशीलता संपण्याची भीती असते. स्वातंत्र्यात अशा मानवी आविष्कारांना संधी मिळते. त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे म्हणजे स्वातंत्र्य. माणूस हा सृजनशील प्राणी आहे. त्याची सृजनशीलता बांधली जाता कामा नये. आपल्याला आपली सृजनशीलता आपल्या देशाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वातंत्र्याचा वापर केला पाहिजे.

Leave a Comment