या गावात १५ ऑगस्टला फडकत नाही तिरंगा


भारताचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट रोजी देशभर साजरा केला जातो आणि त्यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा फडकावितात. देशभरातील प्रत्येक गावी या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रम होतो मात्र पश्चिम बंगालच्या नडीया जिल्ह्यातील दोन गावात १५ ऑगस्टला स्वातंत्रदिनाचा तिरंगा फडकाविला जात नाही. या दोन गावात १८ ऑगस्टला स्वातंत्रदिन साजरा केला जातो. कृष्णनगर म्हणजे शिबनिवास आणि राणाघाट अशी ही दोन गावे आहेत.

भारताला स्वतंत्र मिळाले ते फाळणीसह. १९४७ साली झालेल्या फाळणीत ही दोन गावे पाकिस्तान मध्ये गेली मात्र तेथील लोकांनी हे मान्य केले नाही कारण त्यांना भारतात राहायचे होते. ही दोन गावे हिंदूबहुल आहेत. त्यांनी पाकिस्तानात जाण्यास जोरदार विरोध केला. पण तोपर्यंत तयार केल्या गेलेल्या नकाशात ही दोन गावे पाकिस्तान मध्ये दाखविली गेली होती. या गावातील नागरीकानी त्याविरोधात आंदोलन केले आणि अखेर १८ ऑगस्ट रोजी ही दोन गावे पुन्हा भारतात सामील झाली. त्यामुळे त्यांनी १५ ऐवजी १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

अर्थात सुरवातीला १८ ऑगस्ट रोजी त्यांना तिरंगा फडकाविण्याची परवानगी नव्हती. कारण राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार २००२ पर्यंत सर्वसामान्य नागरिक २३, २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशीच राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो. त्या विरोधात प्रथम स्वातंत्रसैनिक प्रमथनाथ शुकुल आणि त्यांच्यानंतर त्यांचे नातू अंजन यांनी १५ ऑगस्ट ऐवजी १८ ऑगस्टला तिरंगा फडकविण्याची परवानगी मिळावी म्हणून आंदोलन केले आणि अखेर १९९१ मध्ये तशी परवानगी त्यांना दिली गेली.

२००२ मध्ये राष्ट्रीय ध्वज संहितेत सुधारणा केली गेली. त्यानुसार आता कोणीही भारतीय नागरिक घर, कार्यालय, कारखाने येथे कोणत्याही दिवशी राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो.

Leave a Comment