भारत १५ ऑगस्टला यंदा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याला इतकी वर्षे लोटली असली तरी आजही देशातील लाखो गांवे, खेडी समस्यांशी झुंजत आहेत. शिक्षण, बेरोजगारी, विकास, रूढी परंपरा अशा अनेक समस्यांवर आजही यशस्वी तोडगा निघू शकलेला नाही. मात्र भारताचे सगळेच चित्र निराशाजनक नाही. देशात अशीही अगदी छोटी गांवेही आहेत, ज्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहेच पण देशाला अभिमान वाटावा असे काम करून दाखविले आहे. अशाच कांही गावांची ही ओळख
देशवासियांना अभिमान वाटावा अशी गांवे
पोन्निकड हे केरळच्या कोचिन जिल्ह्यातील एक छोटेसे गांव. या गावाने १०० टक्के साक्षरतेचे उदिष्ट गाठले आहे.गावाची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १७५६३. मुलांच्या शिक्षणासाठी अनेक सरकारी योजना येथे राबविल्या गेल्या तसेच या गावात मुले व मुली यांना समान अधिकार मिळतात. देशात या गावात राबविली गेलेली शिक्षणपद्धती सर्वात उत्कृष्ट मानली जाते.
धरनई हे बिहार राज्यातील असेच छोटे गांव. देशातील अनेक राज्यांनी विकासाच्या दृष्टीने चांगले प्रयत्न केले असले तरी बिहार हे मोठे राज्य आजही मागास समजले जाते. रस्ते, रोजगार, विकास या सार्याची आजही येथे प्रतीक्षा आहे. मात्र जहानाबाद जिल्ह्यातील धनरई या गावाचा मात्र संपूर्ण देशाला अभिमान वाटेल कारण या गावाने सौर ऊर्जा ग्राम बनण्याचा पराक्रम केला आहे. गावात सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर केला जात असून त्याचा फायदा गावातील २४०० रहिवाशांना होत आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा गावकर्यांनी स्वतःचा विकसित केली आहे.
पुंसरी- प्रगत गुजराथ राज्यातील साबरकाठा जिल्ह्यातील पुंसरी हे देशातील लाखो खेड्यांचे रोल मॉडेल बनले आहे. सहा हजार लोक संख्येच्या या गावात २००६ पर्यंत सुधारणा म्हणावी अशी एकही गोष्ट नव्हती. मात्र या गावकर्यांनी गावातील चराऊ कुरणे विकून आपला विकास गेला. हे गांव देशातील सर्वश्रेष्ठ व सन्मानित गांव मानले जाते. आज या गावात वायफाय, कम्युनिटी रेडिओ, इको फ्रेंडली वीज, आर ओ प्लांट, सीसीटिव्ही, बँक व स्वतःची बससेवा अशा शहरांनाही मागे टाकतील अशा सुविधा आहेत.
छप्पर हे पंजाबातील गांव असेच आदर्श घालून देणारे गांव ठरले आहे. स्वातंत्र्यांनतर इतक्या वर्षात देशातील महिलांच्या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही हे आपण जाणतो. आजही मुली जन्माला येऊच नयेत यासाठी सवतोपरी प्रयत्न केले जात असताना पतियाळा जिल्यातील छप्पर गावाने महिला व मुलींना त्याचा नेहमीच अभिमान वाटेल अशी कृती केली आहे. या गावात मुलीचा जन्म झाला की आजही आनंदोत्सव साजरा केला जातो, मुलीच्या जन्माचीही मिठाई वाटली जाते. या गावातील महिला घुंघट न घेता मोकळेपणाने सर्वत्र वावरू शकतात हे याचे आणखी एक यश.
ढोकडा हे गुजराथेतील कच्छ भागातील लहानसे गांव तेथे झालेल्या धवल क्रांतीमुळे देशाच्या नकाशावर झळाळले आहे. या गावात दुध व दुग्धजन्य पदार्थांचे पैसे घेतले जात नाहीत. या गावातील सर्वांकडे गायी म्हशी आहेत व ज्यांच्याकडे नाहीत त्यांना दूध व दुधाचे पदार्थ मोफत दिले जातात.५०० वर्षांपूर्वी पीर साईंदत्ता यांनी या गावाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी त्यांनी दुध विकायचे नाही असा नियम गावकर्यांना घालून दिला व तो आजही पाळला जातो.