सरकारने विमान प्रवासाच्या तिकीट दरात केली नऊ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ


नवी दिल्ली – आजपासून विमान प्रवास महाग झाला असून केवळ दोन महिन्यांतच सरकारने दुसऱ्यांदा देशांतर्गत विमान तिकीटांच्या किमती ९ ते १२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. नागरी उड्डान मंत्रालयाने गुरुवारी नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीतील उड्डाणांच्या तिकिटांची किंमत २६०० वरून २९०० करण्यात आली आहे. किमतीत तब्बल ११.५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर, ४० मिनिटांच्या प्रवासासाचे जास्तीत जास्त भाडे १२.८२ टक्क्यांनी वाढवून ८८०० करण्यात आले आहे. ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठीचे कमीत कमी भाडे ३३०० रुपयांएवजी ३७०० असेल. यामध्ये १२.२४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून शुक्रवारपासून जास्तीत जास्त भाडे हे ११ हजार रुपये असेल. याशिवाय ६० ते ९० मिनिटांच्या प्रवासाचे कमीत कमी भाडे ४५०० असेल. यामध्ये १२.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, जास्तीत जास्त भाड्यात १२.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून ते १३२०० असेल.

मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता ९०-१२०, १२०-१५०,१५०-१८० आणि १८०-२१० मिनिटांच्या देशांतर्गत प्रवासासाठी कमीत कमी भाडे अनुक्रमे ५३०० रुपये, ६७०० रुपये, ८३०० आणि ९८०० असेल. १२०-१५० मिनिटांच्या प्रवासासाठीच्या कमीत कमी भाड्याच्या किमतीत ९.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ते ६७०० रुपये करण्यात आले आहे.

विमान प्रवासाचे वास्तविक तिकीट दर या दरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये प्रवासी सुरक्षा शुल्क, विमानतळावरील इतर चार्जेस आणि वस्तू आणि सेवा कर यांचा समावेश नाही. विमान भाड्याच्या मर्यादेत यंदा चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी, मे आणि जूनमध्ये तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.

कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांना मदत करण्यासाठी कमीत कमी विमान भाडे वाढवण्यात आले आहे. तर, सीटची मागणी जास्त असताना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जाऊ नये, यासाठी जास्तीत जास्त दरात वाढ करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.