नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी, लक्ष घालण्यासाठी पत्र


मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात अनेक कामे सुरु आहेत. पण स्थानिक लोकप्रतिनिधी या कामात अडचणी आणत असल्याचे नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नियमबाह्य मागण्या करत हे लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कंत्राटदारांना काम करण्यापासून रोखत असल्याचेही गडकरींनी या पत्रात म्हटले आहे. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, महाराष्ट्र जनतेचे नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना हे पत्र 27 जुलैला लिहिल्याचे समजते. राष्ट्रीय महामार्गाची ही कामे वेळेत पूर्ण झाली नाही, तर प्रकल्पाची किंमत वाढण्याची भीती आहे. त्यामुळे यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं असंही नितीन गडकरींनी या पत्रात म्हटले आहे.

आपल्या पत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले आहे की, केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. पण, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते आहे.

नितीन गडकरींनी आपल्या पत्रात अकोला व नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या सांबी मध्ये चौपदरीकरणाची कामे 4 पॅकेजेस मध्ये सुरू आहेत. शी से वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आलेले आहे.

या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अपेक्ट स्वरूपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंपाटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकत्यामुळे आहे त्या स्थितीत काम अंतिम करणेबाबत विनंती केलेली आहे.

पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु, वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे पूर्णत्वास आलेले आहे. जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाया रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकत्यांनी साहित्याची जाळपोळ करून कंदरा अधिकारी-कर्मचारी कामगार दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील, अपघात वाढतील आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे गडकरींनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. कामे थांबवली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु आणि तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील, तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून मार्ग काढावा अशी विनंतीही गडकरींनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या पत्रानंतर राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी 13 ऑगस्टला राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहून या प्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यांची माहिती कळवावी असे निर्देश दिले आहेत.