खरीप हंगामाकरिता बँकांनी पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – वर्षा गायकवाड


हिंगोली : जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगाम 2021-22 करिता 755 कोटी 82 लाख 25 हजार पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 55 हजार 61 शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या केवळ 336 कोटी 64 लाख 90 हजार म्हणजे 44.54 टक्के पिक कर्ज वितरित झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणांसाठी बँकांनी योग्य नियोजन करुन पिक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट पुर्ण करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरु होवून 2 महिने झाले असून आतापर्यंत जिल्ह्यात 44 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरिता टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरित करण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करत आहेत अशा बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन त्यांना पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बॅंकनिहाय आराखडा तयार करावा.

तसेच त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपुरावा करावा. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 91 हजार 466 शेतकऱ्यांच्या खात्यावर 594 कोटी 86 लाख 99 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचाआढावा घेताना पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, कोरोना उपाययोजनेच्या बाबतीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. तरी आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्ण तयारी करावी.

कृषी विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्ह्यासाठी किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे आणि खत उपलब्ध करुन दिले. तसेच पेरलेला सोयाबीनचे बियाणे उगवल्या नसल्याच्या किती शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याचा पंचनामा करावा आणि दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे. नागरिकांमध्ये कोरोनाची भिती कमी झाल्याने मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याबाबत पोलीस विभागाने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिले. यावेळी बैठकीस विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.