हे आहे जगातील सर्वात अरुंद शहर

जगातील मोठ्या किंवा लहान शहरांची चर्चा नेहमीच होते पण जगातील अरुंद किंवा रुंद शहरांबद्द्द्ल फारसे बोलले जात नाही. पण अशी शहरे आहेत. चीनच्या युनान प्रांतातील यांग्जीन हे शहर जगातील सर्वात अरुंद शहर आहे. वर्ल्डस नॅरोएस्ट सिटी अशीच त्याची ख्याती आहे. नाक्सी नदीच्या दोन्ही तीरावर हे अद्भूत शहर वसलेले आहे. ड्रोन फोटो मधून पाहिले तर ते एकाद्या सँडविच प्रमाणे दिसते. म्हणजे मध्ये नदी आणि दोन्ही तीरावर उंच उंच इमारती.

या शहराची लोकसंख्या ५ लाखाहून अधिक आहे. चारी बाजूनी पहाड आणि मध्ये नदी अशी याची भौगोलिक रचना असून नदीच्या दोन्ही तीरांवर दाटीवाटीने इमारती आहेत. नदी मुळे शहराचे दोन भाग पडले आहेत. या शहरात राहणे सोपे नाही. शहराचा सर्वात अरुंद भाग फक्त ९९ फुटाचा आहे तर सर्वात रुंद भाग आहे ९९० फुटाचा. म्हणजे १०० ते १००० फुट जागेत शहराचा विस्तार आहे. नदीच्या दोन्ही तीरांवर एक एक मेनरोड आहे. नदी मुळे रस्ते अनेक किलोमीटर लांबीचे आहेत पण नदीवर जास्त पूल नाहीत.

आता एखाद्याला वाटेल की असल्या शहरात राहायचे कशाला? पण प्रत्यक्षात या शहरात राहण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात असे समजते. नदी शेजारी असल्याने पूर येतो. पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून इमारतीच्या खालचे खांब उंच आणि अगदी पातळ आहेत. हे खांब इमारती वाचवितात असे सांगतात.

हे शहर फार प्राचीन असून येथे पिढ्यान पिढ्या लोक राहत आहेत. येथून बाहेर पडण्याची त्यांची तयारी नाही. भौगोलिक परिस्थिती अडचणीची असल्याने या शहराचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. कारण चारी बाजूनी पहाड असल्याने मोठ्या शहराना जोडणारे रस्ते फार कमी आहेत.