अडानी, नीता अंबानी, कुमार मंगलम दानशूर परोपकारी यादीत सामील

अमेरिकेतील इंडिया स्पोरा या सामाजिक संस्थेने यंदा प्रथम भारतातील आणि भारताबाहेर राहणारे भारतवंशी दानशूर परोपकारी उद्योजकांची यादी जाहीर केली असून त्यात टॉप १०० मध्ये गौतम अडानी, नीता अंबानी आणि कुमार मंगलम यांच्या नावाचा समावेश आहे. ही यादी तयार करताना ९ ज्युरीच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी या संदर्भात केल्या गेलेल्या याद्या, अश्या व्यक्तीच्या कामाबद्दल पूर्वी सार्वजनिक केलेली कागदपत्रे यांचा आधार घेतला गेला असे समजते.

या यादीत भारतातील नीता अंबानी, गौतम अडाणी, कुमार मंगलम यांच्या बरोबर अमेरिकेतील भारतवंशी मोंटे आहुजा, अजय बंगा, मनोज भार्गव, कॅनडा मधील सोनम अजमेरा, बॉब ढिल्लो, आदित्य झा, ब्रिटन मधील मोहम्मद अमरसि, मनोज बदाले, कुजीनदार बाहिया यांचा समावेश आहे. या सर्व लोकांनी करोना काळात मोठे सामाजिक दायित्व पार पाडले आहे.

इंडिया स्पोराचे संस्थापक एम आर रंगास्वामी म्हणाले, आपल्या समाजात इतक्या मोठ्या संख्येने परोपकारी आहेत ही प्रेरणादायी गोष्ट आहे. या सर्व व्यक्तींनी त्यांचे यश सामाजिक प्रभावात बदलले आहे. भारत विदेश मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार जागतिक स्तरावर ३ कोटी २० लाखाहून अधिक प्रवासी भारतीय आहेत. जगातील ही सर्वात अधिक प्रवासी लोकसंख्या आहे.